आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ST Board Appeal, The Successful Hirkani Abhinav Upkram

वास्तविकता, एसटीच्या हिरकणी कक्षाकडे कानाडोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आपल्या चिमुकल्याला स्तनपान करता यावे, या उदात्त हेतूने महामंडळाने प्रमुख बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय १० मे २०१३ रोजी घेतला. मात्र, अकोला विभागातील नऊ आगार वगळता इतर चार तालुकास्तरासह इतर मोठ्या गावांमधील बसस्थानकांवर हिरकणी कक्षच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे या शहरी बसस्थानकांना सुविधा, तर ग्रामीण भागाकडे डोळेझाक होत असल्याचे चित्र आहे.

तान्हुल्यासमवेत प्रवास करणाऱ्या मातांनी हिरकणी कक्षाचा लाभ घेऊन अभिनव उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले होते. त्यानुसार अकोला विभागातील अकोला एक दोन, अकोट, कारंजा, वाशीम, मंगरुळपीर, रिसोड, मूर्तिजापूर, तेल्हारा या नऊपैकी सर्वच आगारांत ही सुविधा उभारण्यात आली आहे. जिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण नऊ आगार आणि वाहतूक नियंत्रक कक्ष असलेली बसस्थानके आहेत. परिवहन महामंडळाने तान्ह्या बाळासोबत प्रवास करणाऱ्या मातांसाठी सन्मानाचे एक योग्य पाऊल महामंडळाने उचलले होते. त्यानुसार बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ बाय १० फूट आकाराचा हिरकणी कक्ष उभारण्यात येतो. या कक्षात तान्ह्या बालकांसमवेत असलेल्या मातेला प्रवेश दिला जातो.
शिवाय, बसस्थानकावरील हा हिरकणी कक्ष ठळकपणे लक्षात येण्याकरिता सभोवार बालकांचे छायाचित्र असलेले पोस्टर लावल्या जातात. परंतु, ज्या आगार असलेल्या बसस्थानकावर कक्ष स्थापन करण्यात आला, त्याठिकाणी सुविधा नाही. शिवाय सायंकाळी या कक्षाचा कुणी दुरुपयोग करू नये, हे कारण पुढे करून कक्ष बंदच ठेवली जातात. तसेच तालुक्यांचा दर्जा असलेले मालेगाव, मानोरा, पातूर, बाळापूर, बार्शिटाकळी ग्रामीण भागातील हिवरखेड, अनसिंग, बोरगावमंजू या बसस्थानकांवर हिरकणी कक्षच उभारण्यात आल्याने या मातांनी स्तनपानासाठी कुठे जावे, असा संतप्त सवाल प्रवासी वर्गाकडून उपस्थित होत आहे.

आगारांच्या ठिकाणी कक्ष अनेकवेळा राहतो बंद

आगारांच्याठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहेत. मात्र, प्रारंभी ज्याप्रमाणे या कक्षाची माहिती मातांना त्वरित होण्यासाठी प्रचार-प्रसिद्धी ठळकपणे केली जात होती. याशिवाय कक्षामध्ये सुविधाही पुरवल्या जात होत्या. आता हे कार्य पूर्णपणे बंद झालेले आहे. बऱ्याचवेळा हे कक्ष बंद असलेलेच दिसून येतात. हिरकणी कक्षाच्या वास्तविकतेकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
हिरकणी नामक मातेच्या नावावरून कक्ष
रायगडाच्यापायथ्याशी राहणाऱ्या हिरकणी या गरीब दूध विक्रेत्या महिलेने आपल्या तान्हुल्याच्या ओढीने अंधारात रायगडच्या मागील बाजूच्या कठीण अशा उभ्या कडा वरून खाली उतरण्याचे साहस केले होते. दुसऱ्या दिवशी या साहसाची माहिती मिळाल्यावर शिवाजी महाराजांनी हिरकणीचे कौतुक केले होते. हिरकणी सारख्या मातेपासून प्रेरणा घेत महामंडळाने मातांसाठी असलेल्या या कक्षाला हिरकणी असे नाव दिले.
शासनाकडून दुजाभाव
आगारअसलेल्या बसस्थानकांवरच हिरकणी कक्ष निर्माण करण्याबाबतच्या सूचना महामंडळाने दिलेल्या आहेत. आजही अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागात मोठ्या खेड्यामध्ये बसस्थानक असताना याठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले नाहीत. महामंडळाच्या या निर्णयामुळे शहरी ग्रामीण असा दुजाभाव दिसून येतो. याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
नियंत्रक केंद्राबाबत सूचना नाहीत
- हिरकणीकक्ष उभारण्याच्या महामंडळाच्या निर्देशानुसार अकोला विभागातील नऊ आगारांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. वाहतूक नियंत्रण कक्षाबाबत कोणताच निर्णय झालेला नसून, याठिकाणी कक्ष तयार करण्याबाबत कोणत्याच सूचना नाहीत.'' ए.एम. सोले, विभाग नियंत्रक, अकोला.