आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगाची मर्यादा ओलांडत धावताहेत एसटी बसेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वेग नियंत्रणात ठेवणे आवश्यक असतानाही लांबपल्लय़ाच्या अनेक बसेस सुसाट वेगाने धावताना दिसून येत आहेत. अशा गाड्यांचे चालक स्पीड लॉक खुले करून गाड्यांना अनियंत्रित वेगाने चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.

कमी इंधन लागावे, गाड्यांचे अपघात होऊ नयेत, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटू नये या बाबी लक्षात घेऊन बसचा वेग नियंत्रणात असावा यासाठी एसटी बसेसच्या वेगाला र्मयादा घालण्यात आली आहे. तालुका ते जिल्हा असा एसटी बसचा मार्ग असल्यास त्यासाठी ताशी 40 किलोमीटर, एक्स्प्रेस हायवे असेल आणि जिल्हा ते जिल्हा या मार्गावर बस धावत असेल, तर त्यासाठी ताशी 60 किलोमीटरचा वेग नियंत्रित करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही अनेक लांबपल्लय़ाच्या गाड्या सुसाट वेगाने धावताना दिसत आहेत.

परिवहन महामंडळाच्या आगारांमध्ये बसेसना स्पीड लॉक केले जाते. हे स्पीड लॉक कधीही कायमस्वरूपी नसते. त्यामुळे त्यात बदल करणे सहज शक्य होत आहे. काही बसचालक लांबपल्ल्याच्या अंतरावर जात असताना आपल्या बॅगमध्ये एक पाना ठेवतात. या पान्याद्वारे चालक बसचा स्पीड लॉक खुला करतात आणि त्यांना हव्या असलेल्या वेगाने बस चालवतात. अशा प्रकारामुळे अनेकदा बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उतरल्याचे प्रकार घडत आहेत. चालकांच्या अशा नियमबाह्य कृतीमुळे प्रवाशांचा प्रवास मात्र असुरक्षित झाला आहे.

बसचा स्पीड लॉक असल्याने साधारणपणे लांबपल्ल्याचे अंतर ठराविक वेगात गाठणे चालकांकडून शक्य होत नाही. त्याचप्रमाणे प्रवासाच्या मार्गात असलेल्या थांब्यावर थांबणे, अनेक वेळा प्रवाशांच्या चहापानासाठीसुद्धा थांबावे लागत असल्यामुळे निर्धारित वेळेत पोहोचणे शक्य होत नाही, त्यामुळे चालकांकडून स्पीड लॉक खुले केल्या जात असल्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सुरू आहे.अशा प्रकारांची दखल घेऊन राज्य परिवहन महामंडळाने लांबपल्ल्याच्या बसेसची नियमितपणे तपासणी करून बेजबाबदार चालकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

.. तर कारवाई करणार

इंधन बचतीसोबतच बसचा वेग नियंत्रित करण्यामागे अपघात हे मुख्य कारण आहे. प्रत्येक वाहनाला वेगासंदर्भात पट्टे दर्शवण्यात आले आहेत. ठरावीक वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यास चालकाच्या मेंदूत हालचाली होतात. त्याचा परिणाम वाहनाच्या नियंत्रणावर होतो. हृदय आणि मेंदूच्या हालचाली जोरात झाल्यास वाहनांवर नियंत्रण राहत नाही. बसचा स्पीड लॉक खुला करणे चुकीचे आहे. सर्वच चालक असे करत नाहीत. तसे आढळल्यास कारवाई करू.’’ प्रशांत भुसारी, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, अकोला