आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नादुरुस्त बसेसमुळे कोलमडले वेळापत्रक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या पाचही आगारांत बसेस नादुरुस्त असल्यामुळे शेड्युल प्रभावित झाले आहे. त्याचा त्रास जिल्ह्यातील प्रवाशांना सहन करावा लागत आहे, तर शहरातील दोन्ही एसटी आगारांमध्ये असलेल्या 87 बसेसपैकी 15 बसेस नादुरुस्त आहेत. त्यामुळे बर्‍याच गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहे, तर काही गावांच्या बसफेर्‍याही कमी करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहरात जिल्ह्यातून दररोज हजारो विद्यार्थी-नागरिक येतात. जिल्ह्यातील ग्रामस्थांसाठी एसटी हे एकमेव साधन असल्यामुळे प्रवाशांना त्यावरच अवलंबून राहावे लागते. शहरात एसटी महामंडळाचे दोन आगार असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी आगार क्रमांक-1 मध्ये 39, तर 2 मध्ये 48 ,अशा एकूण 87 एसटी बस आहेत. दोन्ही आगारांवरून ग्रामीण भागासह लांबपल्ल्याच्या बसेस नियमित धावतात. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून नवीन एसटी बस येथील आगारात आल्या नाहीत. त्यामुळे सध्या खिळखिळ्या अवस्थेतील बसेस सेवा देत आहेत. यांतील किमान 10 बसेस दोन्ही आगारांतील वर्कशॉपमध्ये विविध कारणांमुळे पडून असतात. याचा प्रभाव एसटी बसच्या नियमित वेळापत्रकावर पडत आहे. मोठ्या बसेस सोबतच ‘यशवंती’ लहान बस अकोला अकोट आणि अकोला शेगावसाठी नियमित धावतात. यांतील 3 बसेसमध्ये बिघाड झाल्याने त्या वर्कशॉपमध्ये उभ्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून येथील आगार क्रमांक 2 वर यशवंती बस सोबतच इतर पाच ते सहा मोठ्या एसटी बस नादुरुस्त अवस्थेत पडून आहे. यामुळे एसटीचे नियमित शेड्युल प्रभावित झाले असून, ग्रामीण भागात एसटी उशिरा पोहोचत आहे, तर शेड्युलमध्ये बदल झाल्याने अनेक ग्रामीण भागात एसटी सेवा खंडित करण्यात येते.

लांबपल्ल्यांचे शेड्युल प्रभावित
आगार क्रमांक 2 मधील बसेस नादुरुस्त असल्याने लांबपल्ल्याचे पाच शेड्युल रद्द करण्यात आले. या पाचही शेड्युडच्या बसेसमध्ये बिघाड झाल्याने त्या एसटी वर्कशॉपवर दुरुस्तीसाठी उभ्या आहेत. परिणामी, या शेड्युलवरील चालक व वाहकांना बस मिळण्यासाठी ताटकळत बसावे लागले.

ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका
ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी एसटी प्रवास सोयीस्कर ठरतो. मात्र, नादुरुस्त बसेसमुळे एसटीच्या नियमित शेड्युलवर परिणाम झाला असून, ग्रामीण भागात बस उशिरा पोहोचत आहे.
फोटो - राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला डेपोमध्ये कायम दुरुस्तीसाठी लागलेल्या बसेस.