आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहकांची कमाई जोरात; एसटी प्रशासन मात्र घोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आपातापामार्गावर धावणाऱ्या एसटीतील प्रवाशांकडून प्रवासभाड्याच्या अर्धे पैसे घेत काही वाहक त्यांची विनातिकीट ‘सफर’ घडवून आणत आहेत. वाहकांकडून होत असलेल्या या ऑफ दि रेकॉर्ड कमाईकडे पुरावा मिळत नसल्यामुळे दुर्लक्ष होत आहे.
काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. वाढलेल्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. परिणामी, एसटी महामंडळाच्या उत्पन्नात चांगलीच वृद्धी झाली आहे. महामंडळासोबतच वाढलेल्या प्रवाशांचा लाभ काही वाहकांनादेखील होत आहे. बसच्या वाहकाने प्रवाशांना तिकिटाचे वितरण करून तिकिटांचे पैसे घेणे आवश्यक आहे. परंतु, काही दिवसांपासून अकोला आपातापा मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये प्रवाशांकडून तिकिटाचे निम्मे पैसे घेऊन त्यांचा प्रवास सुकर करण्याचा प्रकार वाहकांमार्फत सुरू आहे. निम्मे पैसे दिल्यामुळे वाहक प्रवाशांना तिकीटदेखील देत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांचा तिकिटाविनाच प्रवास सुरू आहे तसेच कोणी विचारल्यास आम्ही नुकतेच बसमध्ये चढलो असून, तिकीट काढणार आहोत, असे सांगण्यास वाहक प्रवाशांना प्रवृत्त करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मार्गावर प्रवाशांची गर्दी पाहता उत्पन्न मात्र कमी येत असल्याचे महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या लक्षात आले. या प्रकाराला आळा घालता यावा त्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातर्फे पथकाची नियुक्ती करून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पथकाने आठवडाभरात काही बसची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळून आले. पथकाद्वारे करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान प्रवाशांनी वाहकाने सांगितल्याप्रमाणेच उत्तरे दिल्याने वाहक प्रवासी दोन्हीही बचावल्या जात आहेत. परिणामी, तपास पथकाच्या हाती काहीच लागले नाही. आपातापा मार्गाव्यतिरिक्त अकोला-कानशिवणी, अकोला-आगर या मार्गावरदेखील वाहकांकडून असाच प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एसटीला जास्त पसंती
खासगीवाहनधारकांकडून होत असलेली आर्थिक लूट पाहता यंदा प्रवाशांनी एसटीला जास्त पसंती दिली आहे. ही आकडेवारी केवळ जिल्ह्याची असून, संपूर्ण विभागाचे उत्पन्नही वाढले आहे.'' ए.एम. शेंडे, आगारव्यवस्थापक, अकोला
तपासणी पथक कार्यरत
एसटी महामंडळाच्या वतीने विशेष तपासणी पथक कार्यरत केले आहे. पथकाद्वारे नियमीत तपासणी कार्य सुरू अाहे. कारवाई दरम्यान वाहक दोषी आढळल्यास त्यावर निलंबनाची कारवाई होईल.वाहकाकडून तिकीट घेऊन विना तिकीट प्रवास टाळावा.'' अजयसोले, विभागनियंत्रक, एसटी महामंडळ, अकोला