आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Take Photo Of Bad Roads In Shegaon

खराब रस्त्याचे राज्यमंत्र्यांनी मोबाइलमध्ये काढले फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - एका खासगी कामानिमित्त शेगाव येथे आलेले उद्योग, खनिकर्म सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शिवाजी चौक ते मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर पायीच फिरून या रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा संथ गतीबाबत चांगलेच धारेवर धरले.
विशेष म्हणजे त्यांनी रस्त्याच्या दुर्दशेबाबत त्यांच्या मोबाइलमध्येच फोटो काढल्याने येत्या काळात संतनगरी शेगावचा विकास आराखडा हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शनिवारी खासगी दौऱ्यावर शेगाव, खामगाव येथे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे हे आले होते. पहाटे पाच वाजता ते रेल्वेने शेगाव येथे पोहोचणार होते. मात्र, त्यांची रेल्वे तब्बल चार तास उशिराने शेगाव स्थानकावर आली. त्यामुळे शेगाव रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी विश्रामगृहावर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिराकडे प्रयाण केले.
दरम्यान, रस्त्याच्या मधोमध आल्यानंतर शिवाजी चौकात त्यांनी त्यांचे वाहन थांबवले रस्त्याची पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांनी गाडी थांबवून थेट रस्त्याच्या पाहणीस प्रारंभ केला. नेमके याच चौकात रस्त्याच्या मधोमध दोन मोठे खड्डे पडलेले त्यांना आढळले. एकंदरीत या रस्त्याच्या कामाचा त्यांना अंदाज येताच त्यांनी सोबत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे खामगावचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांना या प्रकाराबाबत जाब विचारून चांगलेच धारेवर धरले.
नंतर गाडीत बसताच राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शिवाजी चौक ते मंदिरापर्यंत पायीच जाणे पसंत केले. नगरपालिकेसमोरील गांधी चौकात रस्ता खोदलेला होता. नाल्यांचे कामही अर्धवट दिसले. यामुळे राज्यमंत्र्यांनी या सर्व कामांचे त्यांच्या मोबाइलमध्ये थेट फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यांच्या या अनपेक्षित पवित्र्यामुळे तेथे उपस्थित अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली होती.

१२५बैठकांनंतरही कासवगती : शेगाव विकास आराखड्यासाठी १२५ बैठका घेण्यात आल्या. दर वेळी मंत्री आले की, ते गाडीच्या खाली उतरत नव्हते. राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शिवाजी चौक ते मंदिरापर्यंत पायी दौरा करत एकंदरीत रस्त्याचे अवलोकन केल्याने त्यांना परिस्थितीची नेमकी जाण आली ते संबंधित अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत सुनावलेसुद्धा. त्यांच्या या आक्रमकपवित्र्यामुळे रखडलेल्या विकास आराखड्याची गाडी आतातरी पुढे सरकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अनपेक्षित पाहणीची चर्चा
शिवाजी चौक ते मंदिरापर्यंत राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी पायीच जाणे पसंत केले. यादरम्यान त्यांनी संपूर्ण रस्त्याच्या दुर्दशेचे, खड्ड्यांचे, अर्धवट झालेल्या नाल्यांच्या कामांचे फोटो थेट आपल्या मोबाइलमध्ये काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा हा अनपेक्षित पवित्रा शहरात नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनला होता