आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Transport Employee Arrested By Anti Corruption Department In Buldhana

पाच हजाराची लाच स्वीकारताना आगारप्रमुखांना पकडले रंगेहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - विभागीय चौकशीत बडतर्फ करता शिक्षेचे स्वरुप सौम्य करण्यासाठी चिखली आगारातील एका कर्मचाऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चिखली आगार प्रमुख पंकज महाजन यांना १७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले. दरम्यान, सध्या त्यांना बुलडाणा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

चिखली एसटी आगारातील दिलीप विठ्ठल पिठले या कर्मचाऱ्याची खाते विभागीय चौकशी सुरू होती. या दोन्ही चौकशीत थेट बडतर्फ करता शिक्षेचे स्वरुप सौम्य करण्यासाठी आगार प्रमुख पंकज छगन महाजन (३५) यांनी दिलीप पिठले यांना १० हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भात पिठले यांनी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. १४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये वर्ग दोनचे अधिकारी तथा चिखली आगार प्रमुख पंकज महाजन यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, त्यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले.
सोबतच पडताळणीदरम्यान तीन हजार रुपये स्वीकारून उर्वरित पाच हजार रुपयांची पंचासमक्ष पंकज महाजन यांनी मागणी केली होती. त्यानंतर १७ नोव्हेंबरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. यावेळी महाजन यांनी चिखली आगारातील त्यांच्या कॅबीनमध्ये सकाळी ११ वाजता पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. याचवेळी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांना बुलडाणा येथील पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, पंकज महाजन यांनी स्वीकारलेली पाच हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३ (१) (ड) सह १३(२) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक एस. आर. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक एस. एल. मुंढे, पोलिस निरीक्षक भाईक, खंडारे, एएसआय भांगे, शेकोकार, नेवरे, गडाख, चोपडे, जवंजाळ, ठाकरे, शेळके, ढोकणे त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

आधी घेतले तीन हजार
खातेविभागीय चौकशीमध्ये बडतर्फ करता शिक्षेचे स्वरुप सौम्य करण्यासाठी मागितलेल्या रकमेपैकी तीन हजार रुपये पंकज महाजन यांनी १४ नोव्हेंबरला स्वीकारलेे. नंतर आज उर्वरित पाच हजार रुपये घेताना ते रंगेहात पकडले गेले.
तक्रारीसाठी संपर्क
कुणीलाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ०७२६२-२४२५४८ किंवा ९४०४४८०६६६ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे पोलिस उपअधीक्षक एस. एल. मुंढे यांनी कळवले.
चिखलीत असंतुष्ट कर्मचाऱ्यांनी वाटले पेढे
आगारप्रमुख पंकज महाजन यांना लाच घेताना अटक झाल्यानंतर चिखली आगारातील काही कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्यावरून या घटनेमागे कर्मचाऱ्यांची तीव्रतेचा अंदाज येतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तिकीट मशीन वाटप करणारा कर्मचारीच गायब झाल्याने चिखली आगाराच्या बसगाड्या जवळपास तीन ते चार तास उभ्या होत्या. त्यानंतर आगारप्रमुखांनी या मशीनचे स्वत: वाटप केले. त्यामुळे चिखली आगाराचा कारभार चांगलाच चर्चेत आला. या घटनेनंतर आता हे प्रकरण उघडकीस आले आहे.