आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा वचक संपला : न्यायालयात दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुगार खेळण्याच्या वादातून झालेल्या सशस्त्र मारहाणीत शेख अक्रम शेख नौरंगाबादी याचा मृत्यू झाला होता. ही घटना 25 जूनच्या रात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. या सर्व आरोपींची पोलिस कोठडी शनिवारी संपल्यामुळे त्यांना रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालय परिसरात दोन्ही गटांच्या जमावाने गर्दी केली होती. पोलिसांनी आरोपींना गाडीतून उतरवताच आरोपींवर जमावाने दगडफेक केली. यामध्ये काही वाहनांच्या काचा फुटल्या आहेत.

पीएच मार्केटमध्ये जुगार खेळताना मोठी रक्कम हरलेल्या आरिफचा जुगार अड्डा संचालकाशी वाद झाला होता. या वादाचे रूपांतर 25 जून रोजी मंगळवारी रात्री सशस्त्र हाणामारीत झाले. या मारहाणीत शेख अक्रम शेख बुर्हान नौरंगाबादी, शेख सलीम शेख बुर्हान व मेहबूब उर्फ मब्बा पहेलवान गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान शेख अक्रम शेख बुरहान नौरंगाबादी याचा घटनेच्या दिवशीच दुपारी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी शेख सुलतान, माजी नगरसेवक शेख फरीद, मोहम्मद आसीफ या तीन आरोपींना सुरुवातीला अटक केली होती. नंतर आरोपंीची संख्या वाढून त्यात शेख नईम शेख गफूर, शेख फईम शेख गफूर, शेख रशिद शेख सुलतान यांना अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी व सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. महाल्ले यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, आरोपींचे वकील अ‍ॅड. दिलदार खान व मोहन मोयल यांनी कोठडीला विरोध केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दुपारी जमावाने रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या बाहेर गर्दी केली होती. मात्र, आरोपींना बंदोबस्तात नेल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा न्यायालयाच्या आवारात हलवला.


दीपक पहुरकरसह चार आरोपी जेरबंद

खंडणी देण्यास विरोध केल्यामुळे एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सातव चौकामध्ये मंगळवारी घडली होती. या प्रकरणाचा सूत्रधार आरोपी दीपक पहुरकर याच्यासह चार जणांच्या मुसक्या रामदासपेठ पोलिसांनी आळवल्या आहेत.
खंडणी न दिल्यामुळे दुकान खाली करण्याची धमकी राजेश भिसे यांना दीपक पहुरकर व त्याच्या गँगने दिली होती. या घटनेची तक्रार भिसे यांनी पोलिसात दिल्यामुळे चिडून जाऊन आरोपी दीपक पहुरकर आणि त्याच्या गँगमधील 8 ते 10 जणांनी मंगळवारी रात्री भिसेंवर तलवारीने हल्ला केला होता. यामध्ये भिसे गंभीर जखमी झाले होते. या गुंडांना पकडण्यासाठी ठाणेदार ठाकूर यांनी एपीआय शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले होते. यातील आरोपी दीपक पहुरकर याला आकाशवाणीच्या मागे असलेल्या एका घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात मनोज जोगदंड, संजीव शिरकरे, कपिल सुनके व कृषिनगरातील एकास त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

खंडणीखोरांचा बिल्डरांना त्रास
नवीन स्लॅब टाकायचा असेल, तर बिल्डरांना आधी गुंडांना खंडणी द्यावी लागते. त्यानंतरच स्लॅब टाकता येतो नाही तर स्लॅब पाडण्याची धमकी देऊन कामबंद पाडल्या जाते. त्यामुळे धाकापोटी बिल्डर पोलिसात तक्रार देण्याऐवजी या गँगस्टरांना पोसत असल्यामुळेच खंडणीखोरांचे मनोबल वाढत आहे. आता ही गँग घर, दुकान, फ्लॅट खाली करून देण्याच्या नव्या धंद्यात उतरली आहे.