आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहराचा बदलणार चेहरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मोकळ्या झालेल्या टॉवर ते फतेह चौक या मार्गाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. हा रस्ता आता दहा फुटांनी रुंद होणार असून, विद्यार्थ्यांसाठी वॉकिंग झोन, सायकल झोन, ऑटो लेन आदी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. प्रशासन या अनुषंगाने तयारीला लागले आहे.
टॉवर ते फतेह चौक मार्गावर जुने बसस्थानक असल्याने रात्री दहापर्यंत हा मार्ग गजबजलेला असतो. शास्री मैदान तयार झाल्यानंतरही नझूलच्या जागेवरील दुकाने कायम असल्याने रस्ता अरुंद झाला होता. बसस्थानकासोबतच खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटो, यामुळे या मार्गावर सतत लहान-सहान अपघात तसेच वाहतुकीची सतत होणारी कोंडी. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. परंतु, या मार्गावरील 47 दुकाने 60 वर्षांनंतर पाडण्यात आली. त्यामुळे लालबहादूर शास्री मैदानातील दुकाने आता थेट दिसताहेत. एवढा मोठा रुंद रस्ता नागरिकांना प्रथमच पाहायला मिळाला आहे. ‘क्लीन अकोला-ग्रीन अकोला’ ही मिशन आता नागरिकांच्या लक्षात आल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेचे अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे.
अतिक्रमण तर काढले, आता पुढे काय? अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पुन्हा दुकाने, हा अनुभव अकोलेकरांनी घेतला आहे. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी कायम उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली होती. प्रशासनही या दृष्टीने तयारीला लागले होते. परंतु, महापालिकेची आर्थिक परिस्थिती या कामात कळीचा मुद्दा ठरली आहे. परंतु, आता अनेक नागरिक प्रशासनाच्या मदतीला धावून येत आहेत.
विद्युत खांबांची अडचण
या मार्गाची डिझाइन सोहेल खान यांनी तयार केली आहे. परंतु, डिझाइननुसार काम करण्यापूर्वी या मार्गावर रस्त्यालगत असलेले चार विद्युत खांब व दोन रोहित्र अन्यत्र हटवावे लागणार आहेत. यासाठी 25 लाख रुपये खर्च येणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता 25 लाख रुपये खर्च करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे 25 लाख रुपयांची सोय कशी करावी, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
वॉकिंग स्ट्रीट

सोहेल खान आले मदतीला
मेलबोर्न येथे एम-आर्च शिक्षण घेतलेल्या सोहेल खान सुभान खान यांनी तीन वर्षे मेलबोर्न येथे आर्किटेक्ट म्हणून काम केले आहे. अतिक्रमण मोहीम राबवताना त्यांनी दर्शक म्हणून हजेरी लावली होती. अतिक्रमण काढल्यानंतर या मार्गाचे नवे डिझाइन तयार करण्याची इच्छा त्यांनी उपायुक्त चिंचोलीकर यांच्याकडे बोलून दाखवली. उपायुक्तांनी सोहेल खान यांची आयुक्तांशी भेट घालून दिली. त्यानंतर सोहेल खान यांनी कोणतेही शुल्क न घेता, या मार्गाची वेगवेगळ्या पद्धतीने डिझाइन तयार करून दिले.