आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पथदिवे नव्हे कवडसे’, अंधेरा कायम है

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नागरिकांना जशा मूलभूत सोयी-सुविधा मिळणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे प्रकाश व्यवस्थेबरोबरच शहराच्या सौंदर्यात आणि आकर्षणात मोलाची भर घालणारे पथदिवेही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. मात्र, आज शहरातील पथदिव्यांची वाट लागली आहे. 14 प्रमुख मार्गांवरील बंद पथदिव्यांची संख्या पाहता हे पथदिवे की कवडसे? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
1932 ला विजेवरील पथदिवे सुरू झाले. आज प्रमुख मार्गांसह विविध भागांतील रस्त्यांवर 16 हजार 694 पथदिवे मनपाने लावले आहेत. यापैकी 15 हजार 598 पथदिवे महावितरणच्या पोलवर आहेत, तर एक हजार 396 पथदिवे खांबांवर आहेत. मनपाला पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर महिन्याकाठी 10 ते 11 लाख रुपये खर्च करावा लागतो, तर विद्युत देयकापोटी 9 ते 10 लाख रुपये खर्च करावा लागतो. पूर्वी पुणे येथील एशियन कंपनीला संपूर्ण शहरातील पथदिवे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले होते, तर आता प्रभागनिहाय दुरुस्तीचे कंत्राट दिले आहे.

त्या काळी नवलाचा विषय
1931 साली शहरात वीज आली. त्यानंतर रस्त्यावर विजेच्या दिव्यांचा प्रकाश पडला. 1932 ला वातीशिवाय जळणारे दिवे शहरासह खेड्यापाड्यातील नागरिकांसाठी नवलाचा विषय होते. ग्रामस्थ वातीशिवाय जळणारे दिवे पाहण्यासाठीच शहरात येत होते.
13 हजार पथदिव्यांची गरज
महापालिकेचे क्षेत्रफळ 28 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे, महापालिका 2800 हेक्टर (6918 एकर, 30 कोटी 13 लाख 89 हजार 492 चौरस फूट) पसरली आहे. पथदिव्यांचे वॉट, खांबाची उंची यावर लाइट किती चौरस फूट जागेवर प्रकाश देतो, ही बाब निश्चित होते. परंतु, सरासरी एक पथदिव्याच्या माध्यमातून 2500 चौरस फूट जागा प्रकाशमान होते. शहरातील प्रमुख मार्गांसह गल्लीबोळातील रस्त्याची एकूण लांबी 1140 किलोमीटर आहे. म्हणजेच, शहरात 7 कोटी 47 लाख, 84 हजार स्क्वेअर फूट रोड एरिया आहे. यानुसार शहरात किमान 29 हजार 913 पथदिव्यांची गरज आहे. परंतु, प्रत्यक्षात पथदिव्यांची संख्या 16 हजार 694 आहे. त्यामुळे शहरात 13 हजार पथदिवे उभारण्याची अथवा सुरू करण्याची गरज आहे.

14 रस्त्यांची लांबी 32 किलोमीटर आहे. या 14 रस्त्यांवर 698 पथदिवे बंद आहे. पथदिव्यांची जमिनीवर प्रकाश व्यापण्याची क्षमता लक्षात घेता या रस्त्यांवर 2752 पथदिव्यांची गरज आहे. प्रत्यक्षात या मार्गावर 1200 पोल आहेत. (यापैकी काही पोलवर दुतर्फा पथदिव्यांची व्यवस्था आहे.) त्यामुळे 68 लाख 80 हजार चौरस फूट जागेपैकी केवळ 12 लाख 50 हजार चौरस फूट जागेवरच या पथदिव्याचा प्रकाश पडतो. उर्वरित जागेवर अंधार आहे. त्यामुळे पथदिवे कवडसे ठरले आहेत.

- पथदिवे विविध कारणांनी बंद पडतात. पावसाळ्यात जोराचा वारा आल्यास तसेच जास्त पाऊस झाल्यास, कार्बन तयार झाल्यास पथदिवे बंद पडतात. सरासरी शहरातील एकूण पथदिव्यापैकी 12 टक्के पथदिवे बंद आहेत.’’ अमोल डोईफोडे, विद्युत विभागप्रमुख, महापालिका.