आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुविधेचे तीनतेरा: एसटीच्या नियोजनाचा अभाव; ६० टक्के बस सुटतात अवेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अवैध प्रवासी वाहतूक, वाढता इंधनाचा खर्च आणि आधुनिक सुविधांच्या स्पर्धेचा सामना यामुळे एसटी आर्थिक कचाट्यात सापडली आहे, तर दुसरीकडे ६० टक्के गाड्या निर्धारित वेळेत सुटणे, मनुष्यबळाचा अभाव, गाड्या अचानक रद्द होण्याच्या प्रमाणाचा फटकाही एसटीला बसत आहे. महामंडळाच्या उपाययोजनांचे नियोजनाचा अभाव असल्यामुळे एसटीची गती मंदावत आहे.
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांना एसटीने जोडले आहे. आधुनिक सुविधा देणाऱ्या खासगी वाहतूक सेवेचा सामना एसटीला करावा लागत आहे. त्यामुळे राज्याची लाइफ लाइन म्हणून ओळख जाणारी एसटी तोट्यात आहे. अपुऱ्या बस, रिक्त पदे, नियाेजनाचा अभाव, बिघडलेले वेळापत्रक यामुळे एसटीचा प्रवास अधिकच बिकट होत चालला आहे. अकोला आगारातून दररोज लाखो किमी अंतर धावण्याचे एसटीचे नियोजन असते. मात्र, प्रत्यक्षात विविध कारणांनी एसटी रद्द होतात. हे प्रमाण १० ते १५ टक्के आहे. याचा आर्थिक फटका एसटीला बसतो.
...तर प्रवासी पुन्हा एसटीकडे वळतील : एसटीवेळेवर सुटत नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गाड्या वेळेत धावल्या, तर प्रवासी पुन्हा एसटीकडे वळतील. एसटीने चांगल्या दर्जाची सेवा द्यावी. तसेच, खराब गाड्यांमुळे प्रवासी एसटीकडे पाठ फिरवत असल्याची स्थिती आहे.
प्रदीप भुसारी, प्रवासी
रिक्त पदांचाही मोठा भार : अकोला विभागीय कार्यशाळेत ५६ कामगार, तर सर्वच डेपोमध्ये कामगारांची अनेक पदे रिक्त आहेत. शिवाय एसटीची मदार असलेल्या चालक-वाहकांचीसुद्धा मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्याचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांवर पडतो. यामुळे नियोजन कोलमडत असल्याचे दिसत आहे.
गाड्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले : अकोला बसस्थानकावरून बहुतांश गाड्या वेळेवर सुटत नाहीत. यातील काही गाड्या तर अचानक रद्द होतात. हे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांची स्थिती नीट नसल्याने काही गाड्या रस्त्यातच बंद पडतात. परिणामी, गाडी रद्द होते. वाहक नसल्याने काही वेळा गाडी रद्द करावी लागते.
विभागातील दीडशेंच्यावर गाड्या बंद : अकोला विभागातील दीडशेहून अधिक बसगाड्या बंद अवस्थेत आहेत. काही गाड्यांंची डिझेल पाइप तुटली, तर काहींच्या एअर लॉकसारख्या समस्या आहेत. अनेक गाड्या दुरुस्तीअभावी डेपोत बंद पडलेल्या आहेत. या गाड्या लवकर दुरुस्त करण्याची गरज आहे.
विभागात नऊ डेपो
विभागात अकोला एक दोन, अकोट, कारंजा, वाशीम, मंगरुळपीर, रिसोड, मूर्तिजापूर, तेल्हारा आदी डेपोंचा समावेश आहे. या सर्व डेपोंमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
वेळेवर एसटी सुटण्याची आवश्यकता

- गाड्यांचे वेळापत्रक बिघडलेले आहे. विभागीय कार्यालयासोबतच मध्यवर्ती कार्यालय आणि आगार प्रशासनाकडून एसटीचे नियोजन करावे. गाड्या वेळेवर धावल्या, तरच एसटीचा प्रवासी दुरावणार नाही. त्यासोबतच प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी सौहार्दपणे वागायला हवे.''
मधुकर चव्हाण, विभागीय सचिव, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना
विभागातील काही गाड्यांची स्थिती दयनीय बनली आहे. टायरपासून ते इंजिनपर्यंत गाड्या नादुरस्त असल्याने एसटीला दुहेरी फटका बसत आहे. गाड्यांच्या दुरुस्तीसाठी करावा लागणारा खर्च, तर खराब गाड्यांमुळे प्रवासी एसटीकडे पाठ फिरवत अाहेत. वाघागढ, ढगादेवी, माना-कुरूम, कारंजा, शेगाव, नागझरी, पोहरादेवी आदी तीर्थक्षेत्र आणि काटेपूर्णा, ज्ञानगंगा, नरनाळा, कारंजा सोहळ, मेळघाट ही अभयारण्ये जवळ असल्याने प्रवाशांची संख्या मोठी आहे.