आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आले धोक्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराकडे समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

शहरातील संतोषी माता चौकात शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी इयत्ता 11, 12 वी चे 100 विद्यार्थी राहतात. ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी असल्याने काही ना काही कारणावरून प्रशासनासोबत त्यांचे नेहमीच खटके उडतात. जेवणाच्या कारणावरून ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांनी गृहपालासोबत वाद घातला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने या प्रकारावर पडदा पडला होता. या ठिकाणच्या जेवणाचा कंत्राट उके यांच्या बचत गटाला देण्यात आला होता, तर सध्या पाटील यांच्या राजराजेश्वरी बचत गटाला देण्यात आला आहे. कंत्राटदाराकडून निकृष्ट जेवण दिल्या जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वसतिगृहाची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतागृहे, खोल्यांची नियमित सफाई होत नसल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दूषित पाणी प्यायला मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण होते. समस्यांबाबत वेळोवेळी प्रशासनाला जाणीव करून दिली जाते. मात्र, काहीही उपयोग होत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

माझ्यापरीने प्रयत्न करते
वसतिगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी मी जातीने घेते. पण, तांत्रिक अडचणीमुळे बरेचदा काही प्रश्न भेडसावतात. माझ्याकडे मुलांच्या वसतिगृहाचा अँडिशनल चार्ज आहे. तरीसुद्धा मी येथील समस्या निवारणार्थ प्रयत्न करत आहे. व्ही.बी.कुळकर्णी, प्रभारी गृहपाल

स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
वसतिगृहामध्ये साफसफाई करणारे नाहीत. त्यामुळे खासगीत काम करणार्‍या व्यक्तीकडे स्वच्छतेची जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे स्वतंत्र सफाई कामगार नेमण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. स्वतंत्र सफाई कामगार नेमण्यात आल्यानंतर स्वच्छतेचा प्रश्न मिटेल.