आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार, धामणगाव मार्गावर घडला अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- शाळा सुटल्यानंतर बाहेर पडलेल्या दहा वर्षांच्या विद्यािर्थनीला तंत्रनिकेतन विद्यालयाच्या एका विद्यार्थ्याच्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्या चिमुकलीचा रुग्णालयात उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी जानेवारीला दुपारी धामणगाव मार्गावरील वसंतराव नाईक विद्यालयासमोर घडली.
रेणुका दोनाडकर वय 10 वर्षे रा. सावर, ता. बाभुळगाव ह. मु. वसंतराव नाईक शाळेचे वसतिगृह असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती वसंतराव नाईक विद्यालयात पाचव्या वर्गात शिकते. रेणुकाचे आईवडील यापूर्वीच मरण पावले आहेत. त्यामुळे ती तिच्या आजोबांकडे राहत होती. शाळेच्या वसतिगृहात राहून ती शिक्षण घेत होती. मात्र, तिला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नसल्याने ती बुधवारी दुपारी तिच्या आजीसोबत शाळेतून साहित्य घेऊन घरी जाण्यासाठी आली होती. ती तिचे साहित्य घेऊन शाळेतून बाहेर पडली. ती शाळेसमोर असलेला रस्ता आेलांडण्याच्या प्रयत्नात असताना त्याच रस्त्यावरून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकणारे तीन विद्यार्थी त्यांची करिझ्मा दुचाकी क्रमांक एमएच २९ एएफ ०८८० ने भरधाव जात होते. या दुचाकीने रस्ता आेलांडणाऱ्या चिमुकल्या रेणुकाला जबर धडक दिली. त्या अपघातात रेणुका दुचाकीत अडकून फरपटत गेली. हा अपघात इतका भयावह होता की, त्यात रेणुका गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला.

अपघाताला कारणीभूत ठरलेले दुचाकीस्वार सुयश नागोराव कोंपलवार, योगेश बडणेर हे दोन्ही विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात द्वितीय वर्षाला शिकतात. या अपघातात त्यांच्यापैकी एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील डीबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळ गाठले. याप्रकरणी दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे तो युवक चालवत असलेली दुचाकी ही दुसऱ्याचीच असून, त्याच्याकडे दुचाकी चालवण्याचा परवानाही नव्हता. त्यामुळे हे प्रकरण आणखीच गंभीर झाले आहे.