आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नाही गणवेश; गणवेशाची रक्कम दिल्याचा उपशिक्षणाधिकार्‍यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील सर्व शाळांची घंटा 26 जून रोजी वाजणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश मिळणे आवश्यक असताना, गणवेशाची रक्कम शाळांपर्यंत अद्यापही पोहोचली नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाही, तर सर्व शाळांना गणवेशाची रक्कम अदा करण्यात आल्याचा खोटा दावा सर्व शिक्षा विभागाने केला आहे.

राइट टू एज्युकेशन अंतर्गत पहिली ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेश देणे सक्तीचे आहे. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करणे क्रमप्राप्त आहे. सर्व शिक्षा अभियानाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यामध्ये विशिष्ट रक्कम टाकत असते. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती कापड खरेदी करून कपडे शिवून घेते व विद्यार्थ्यांना ते वितरित करत असते.

मात्र, शाळा सुरू होण्यास दोन दिवस उरले असताना विद्यार्थ्यांच्या गणवेशाची रक्कम संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचली नसून, केवळ 65 टक्के शाळांपर्यंत गणवेशाची रक्कम पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर 100 टक्के शाळांना गणवेशाची रक्कम अदा करण्यात आल्याचा दावा सर्व शिक्षा विभागाचे संयोजक उपशिक्षणाधिकारी प्रभाकर मेहेरे यांनी केला आहे.
दोन गणवेशासाठी केवळ 400 रुपयांची तरतूद
काही वर्षाअगोदर यंत्रमाग महामंडळ शालेय विद्यार्थ्यांना कापड पुरवत होते. त्यानंतर मात्र ही प्रक्रिया बंद करण्यात आली आणि शाळा व्यवस्थापन समितीला गणवेशासंबंधी अधिकार देण्यात आले. प्रतिविद्यार्थी दोन गणवेशासाठी 400 रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी एका गणवेशासाठी 155 रुपये कापड खरेदी आणि 45 रुपये कापड शिवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येतात.

गेल्यावर्षी 15 आॅगस्टपर्यंत मिळाले नव्हते गणवेश
गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना 15 आॅगस्टपर्यंत शालेय गणवेश मिळाले नव्हते. सर्व शिक्षा विभागाकडे परिपूर्ण निधी असतानाही केवळ उदासीनतेपोटी विद्यार्थ्यांच्या गणवेशास विलंब झाला होता. यंदाही सर्व शिक्षा विभागाचा कारभार कासवगतीने सुरू असून, शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गणवेश मिळणार नसल्याचे वास्तव आहे.