आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना शासकीय योजनांमध्ये प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. - Divya Marathi
संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
बुलडाणा - शासनाच्या वतीने जनसामान्यांसाठी विविध शासकीय योजना राबवण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गरिबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबालाही योजनेचा लवकर लाभ मिळत नाही. या योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी शासनाच्या विविध योजनांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आनंदराव दुधमल या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुुरुवार २१ मे रोजी सांत्वनपर भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या वेळी त्यांनी दुधमल कुटुंबातील सदस्यांसोबत आत्मियतेने संवाद साधला. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर धीर सोडता खंबीरपणे परिस्थितीचा सामना करा, शासन तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात कुटुंबीयांना त्यांनी धीर दिला. तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत खासदार प्रतापराव जाधव, आमदार भाऊसाहेब फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जळगाव जामोदचे नगराध्यक्ष रामदास बोंबटकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, मुख्य वनसंरक्षक तथा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डी. के. त्यागी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा पोलिस अधीक्षक श्याम दिघावकर, जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते.
शेतकरी आनंदराव दुधमल यांची पत्नी नलीनी, मुले सुनील, गोपाल, दिनेश तसेच मुलगी पुष्पा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास संवाद साधला. या कुटुंबास सिंचन विहिरीसोबतच शासनाच्या सोलर पंप योजनेचा लाभ देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर लाडणापूर गावातील शेतकऱ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. चर्चेदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यानंतर आवश्यक त्या सुधारणा तातडीने केल्या जातील, असे आश्वासन दिले.

ताफ्यात केवळ दोनच लाल दिवे
मुख्यमंत्र्यांच्याताफ्यात अनेक वाहने होती. मात्र, लाल दिव्यांची वाहने दोनच होती. यातील एक वाहन मुख्यमंत्री फडणवीस यांचे होते, तर दुसरे वाहन महाराष्ट्र राज्य यंत्रमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे होते.

तुपकरांनी दिली ठेचा-भाकर भेट
टुनकीयेथे हेलीपॅडवर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठेचा भाकर भेट म्हणून दिली. ही भेट आपण परतीच्या प्रवासादरम्यान हेलीकॉप्टरमध्ये खाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी तुपकर यांना सांगितले.

सव्वा दोन लाख रुपयांचे वितरण
शेतकरीकुटुंबास भेट देण्यापूर्वी टुनकी येथे हेलीपॅडवर आगमन झाल्यानंतर तिथेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्याघ्र प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या चुनखडी येथील नागरिकांना बँकेचे पास बुक प्रमाणपत्रांचे वितरण केलेे. चुनखडी येथे पुनवर्सन होणाऱ्या २२५ कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन लाख २५ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले असून, त्या खात्याचे पुस्तक या वेळी सुभाष नाथू तडवला, जीवनसिंग सुभाष तडवला, जमुनाबाई गणपत जमरा, लाडकीबाई बदा जमरा, ग्यानसिंग बाथल्या डावर, रमेश छगन चंगळ आदींना वितरीत करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...