आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळी शिकवणी वर्गातून होतेय संवेदनशीलता घडवण्याचे कार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कॉम्प्युटर,मोबाइलच्या जमान्यात मुलांमधील संवेदना हरवली आहे. शाळा, ट्युशन, अभ्यास यामुळे विद्यार्थ्यांचे एकप्रकारे यांत्रिकीकरण झाले आहे. व्यक्ती जोपर्यंत संवेदनशील नसेल तोपर्यंत काहीतरी करण्याची जिद्दच निर्माण होऊ शकत नाही. या उन्हाळी शिकवणी वर्गात मुलांचा बौद्धिक, शारीरिक विकासासह त्यांच्या संवेदना जपण्याचे काम केले जाते. हा शिकवणी वर्ग नसून, मुलांमध्ये संवेदनशीलता घडवणारा वर्ग आहे, असे प्रतिपादन गोपाल आखरे यांनी केले. २१ जून रोजी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या हॉलमध्ये नि:शुल्क उन्हाळी शिकवणी वर्गाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
डाबकी रोड येथील रेणुका माता मित्र मंडळाच्या वतीने मागील २७ वर्षांपासून दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुटीत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा शिकवणी वर्ग घेतला जातो. यंदा मांगीलाल शर्मा विद्यालयात जूनपासून हा वर्ग नियमित सुरू झाला. रविवारी त्याच्या समारोप समारंभात गोपाल आखरे यांनी या वर्गाचा विद्यार्थी लाभ घेत नसल्याची खंत व्यक्त केली. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये मानसिक बदल घडत आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द आणि अश्रूंपेक्षा कृतीला अधिक महत्त्व आहे. आपल्या भावना कृतीतून कशा व्यक्त होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण हे शिकवणी वर्ग आहे, असे ते म्हणाले. पैसे देऊन सगळ्या वस्तू मिळू शकतात, पण कितीही पैसे दिले तरी आपुलकी मिळत नाही. भावना कशा जपायच्या, नाती कशी जोडायची हे कुठेही शिकवले जात नाही. मात्र, हे सर्व या वर्गात मुलांना शिक्षणासोबत मिळते, असे मत माहापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी व्यक्त केले. दोन महिन्यांच्या या सुटीत मिळालेले हे ज्ञान, शिक्षण ही मुलांसाठी आयुष्यभराची शिदोरी आहे. या काही महिन्यांच्या शिकवणीतून त्यांचे अख्खे आयुष्य घडते, असे त्या म्हणाल्या.
मागील २७ वर्षांपासून क्लासचा हा उत्साह अजूनही कायम आहे. आधी विद्यार्थी, मग क्लासमध्ये शिकवणारा दादा, नंतर आयोजन व्यवस्था आणि आज व्यासपीठावर पाहुणे म्हणून आदर हा सर्व प्रवास भारावून टाकणारा आहे, असे भावोदगार बाल मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अमरजित वाघ यांनी व्यक्त केले.

त्यांनी क्लासच्या जुन्या आठवणी सांगत या वर्गाने मला माणूस बनायला शिकवल्याचे मत व्यक्त केले. सीमा बक्षी यांनी कवितेतून बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअॅप यामुळे व्यक्ती घडत नसतो. मुलांवर लहानपणी चांगले संस्कार झाले पाहिजे. पण, आजकाल पालकांकडे त्यासाठी वेळ नाही. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट विकत घेण्यासाठी भरमसाट पैसा आहे. मात्र, काहीही पैसे घेता नि:शुल्क मुलांचे बालपण जपण्यासाठी धडपणारा हा वर्ग अनमोल आहे, असे मत त्यांनी मांडले.

विद्यार्थी नव्हे तर चांगला माणूस घडवण्याची परंपरा या वर्गाने जपली आहे, असे मत इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. किशोर मालोकार यांनी व्यक्त केले. इंडियन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष डॉ. आर. एन. भांबुरकर यांनीदेखील या वेळी विचार मांडले. माजी विद्यार्थी दीपक पाथरकर, रश्मी तल्हार आणि गौरी वडतकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात नंदू जोगळेकर यांनी वर्ग सुरू करण्यामागची भूमिका आणि घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन चैताली वाकोडे हिने, तर आभार नितीन देशमुख यांनी मानले. या वेळी डॉ. राम पांडे, मुकुंद गिरी, पल्लवी देशमुख, अमिता चोपडे, सोनल मोरे, श्रीया भिडे, सानिका भिडे, गौरव गिरी, पवन राठोड, मंदार जोगळेकर, कविता देशमुख, सुषमा गिरी, मेघा पाचरे, आनंद पाचरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

२३विद्यार्थ्यांना साहाय्य
आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकांतील जवळपास २३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. त्यांना गणवेश, नोटबुक, कंपास यांसारखे शालेय साहित्य देऊन साहाय्य करण्यात आले.

विविधस्पर्धांचे बक्षीस वितरण
दोनमहिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकाला भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यात वादविवाद, वक्तृत्व, एकाला वाचवा, समयसूचकता, स्वयंशासन, अंताक्षरी, प्रश्नमंजूषा, निबंध, रांगोळी, चित्रकला, शब्दोच्चार, जोडाक्षर, हस्ताक्षर, स्मरणशक्ती, लांब उडी, धावणे, स्लो सायकल, फॅन्सी ड्रेस, क्रांतिकारकांचे नाव लिहा, मराठी उजळणी, उलटी उजळणी, मराठी मुळाक्षरं नानाविध स्पर्धा घेण्यात आल्या.

ताई-दादांनी शिकवले
दोनमहिन्यांच्या या क्लासमध्ये अनेक ताई आणि दादांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान यासह विविध विषयांची माहिती दिली. यात चैताली वाकोडे, निकिता आंबेकर, आकांक्षा लांजुरकर, वर्षा येन्नेवार, स्वप्निल काळे, अंकिता उंबरकर, चंचल चोपडे, पीयूष नागलकर, अभय कुटे, पूजा पोहरे, रश्मी तल्हार, रोहन भिडे, श्रेया नेडिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांचा सत्कार
इंडियनरेडक्रॉस सोसायटीच्या वतीने उपायुक्त माधुरी मडावी आणि बाल मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अमरजित वाघ यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शहरातील मालमत्तांचे मोजमाप करण्याची आव्हानात्मक कामगिरी उपायुक्त माधुरी मडावी यांनी पार पाडली. तसेच देशातील पाच बाल मेंदूरोग तज्ज्ञांपैकी एक तज्ज्ञ डॉ. अमरजित वाघ हे अकोल्याचे असून, ते आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. यामुळे या दोन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

नि:शुल्क उन्हाळी शिकवणी वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात उपायुक्त मडावी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...