आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळात तेरावा महिना; १६ जूनपासून अधिक मास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहेत. त्यात भरीस भर म्हणजे यंदा १७ जूनपासून अधिक महिना सुरू होणार आहे. २६ जुलैला त्याची सांगता होईल. त्यामुळे यंदा ऐन पेरणी पाण्याच्या दिवसांत ‘दुष्काळात तेरावा महिना’ ही उक्ती प्रत्यक्षात साकार होणार असून जावयांसाठी ही पर्वणी ठरणार आहे, तर पारंपरिक रूढीमुळे सास-यांना ख-या अर्थाने दुष्काळाची झळ बसणार आहे.

मराठी कालगणनेनुसार वर्षाचे बाराच महिने असतात, परंतु दर तीन वर्षांनी एक महिना जास्त धरावा लागतो. त्या तेराव्या महिन्याला अधिक मास म्हणतात. यामध्ये पारंपरिक व्रतवैकल्यांसोबतच जावईबापूंचीसुद्धा सरबराई केली जाणार आहे. जावयांना दान दिल्याने पुण्य मिळते, असा पिढ्यान््पिढ्यांचा समज आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून दुष्काळात होरपळलेल्या सासरेबुवांना ही सरबराई चांगलीच जड जाणार आहे. यामध्ये जावयांना खायला दिल्या जाणा-या धोंड्यामध्ये सोन्या, चांदीचे दान दिले जाते. ही प्रथा आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण सद्य:स्थिती पाहता अनेकांना कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी दुष्काळाची अधिक झळ बसणार आहे.

काय आहे अधिक मास? : ख्रिश्चन कालगणनेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात, तर मराठी कालगणनेनुसार वर्षाचे ३५४ दिवस असतात. ख्रिश्चन कालगणना चंद्रावर, तर मराठी कालगणना सूर्यावर आधारित असते. ख्रिश्चन कालगणनेत दर तीन वर्षांनी लीप वर्ष असते, तर मराठी कालगणनेच्या दिवसांची तूट भरून काढण्यासाठी दर ३२ महिने १६ दिवसांनी म्हणजेच तीन वर्षांनी येणारा महिना हा अधिक मास ठरवला आहे.

हिंदूचे सण २० दिवसांनी उशिरा
अधिक मास असलेल्या वर्षी नागपंचमी, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण सुमारे २० दिवस उशिराने येतात. यंदा हे सर्व सण उशिराने येणार आहेत.

लग्नासाठी सहा मुहूर्त
मराठी महिन्याच्या दरमहिन्याला सूर्य एक राशी संक्रमण करतो. पण या तेराव्या महिन्यात सूर्य संक्रमणच नसते. या मासात लग्नकार्य आदी मंगलकार्ये करत नाहीत. त्यामुळे जून महिन्यात लग्नाकरिता अवघे सहा मुहूर्त आहेत.

सप्ताह की आठवडा ?
मराठीतील ‘आठवडा’ या शब्दांत जरी ‘आठ’ हा शब्द येत असला तरी त्याचा कालावधी हा आठ नाही, तर सात दिवसांचा असतो. एका आठवड्यातील सात दिवसांना क्रमाने रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार अशी नावे आहेत.

मराठी महिने असे : चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन.

काही वर्षांनी क्षयमास
या अधिक महिन्यात सूर्याचे कोणतेही राशी संक्रमण नसते. परंतु काही वर्षांनी असे घडते की, एखाद्या महिन्याला सूर्य दोन राशींचे संक्रमण करतो, त्या विशिष्ट महिन्याला क्षयमास म्हणतात. तो महिनाच त्या वर्षात पाळत नाहीत. ते वर्ष १२- १=११ महिन्यांचे होईल म्हणून क्षयमास येणा-या वर्षात अधिक महिने दोन येतात. म्हणजेच ११ + २ = १३ महिन्यांचे ते वर्ष होते. या दोन महिन्यांतील क्षयमासापूर्वीचा महिना मंगलकार्यास वापरत नाहीत, परंतु अधिक मास पुण्यकर्मासाठी असताे.