आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमावस्येची रात्र ‘काळरात्र’ मेजावर टकटक ‘कटकट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. पण, आजघडीला काही पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तीन प्रकारच्या अंधश्रद्धेत अडकल्याचे चित्र आहे. परिणामी, या कायद्याची पारदश्रकपणे अंमलबजावणी होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कुठल्याही पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तेथील स्टेशन डायरीचा डेबल किंवा अन्य टेबलवर दोन ते तीन वेळा बोट आपटले तर येणार्‍या 24 तासांत तक्रारी वाढतील आणि आपल्या मागे ‘कटकट’ लागेल, असा दृढ समज काही पोलिसांत आहे. त्यामुळे टेबलवर बोटाच्या किंवा अन्य वस्तूच्या साहाय्याने टकटक आवाज केला, तर तत्काळ तेथे असलेला कर्मचारी आवाज करणार्‍यांवर खवळतो आणि शांत राहण्याचे सांगतो. मग टकटक वाजवणारी व्यक्ती कुणीही असो. अमावस्येच्या रात्री वाईट प्रवृत्ती बळावतात.
त्यामुळे याच रात्री जास्त गुन्हे घडतात, असाही (गैर)समज पोलिसांत आहे. परिणामी, अनेक वर्षांपासून इतर रात्रीपेक्षा अमावस्येच्या रात्री 10 वाजतापासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला जातो. रात्रीची गस्त काटेकोरपणे केली जाते. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. तिसरी महत्त्वाची अंधश्रद्धा म्हणजे र्मगची (आकस्मिक, अपघाती मृत्यू) नोंद झाल्यास येणार्‍या काही दिवसांत आणखी दोन र्मग दाखल होतीलच, असाही समज अनेक पोलिस कर्मचार्‍यांचा आहे.
इंग्रजकाळापासूनचे समज
या अंधश्रद्धांची सुरुवात केव्हापासून आणि कुठून झाली, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला असता निश्चित उत्तर मिळाले नाही. पण, या अंधश्रद्धा महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाण्यात याच प्रकारे असल्याचे अनेकांनी सांगितले. इंग्रजकाळापासून त्या चालत आल्या असून, परंपरेने त्या पुढच्या पिढीकडे जात आहेत.

आदेश किंवा सूचना नाहीत
अशा काही प्रथा आहेत हे मला माहिती नाही. पण, असेल तर तो त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. या गोष्टी परंपरने चालत आलेल्या असाव्यात. त्याबाबत कुणाला काहीही आदेश किंवा सूचना दिलेल्या नाहीत. अमरसिंग जाधव, एसडीपीओ (शहर)

कायद्याचे उल्लंघन नाही
पोलिसांतील या अंधश्रद्धेविषयी आम्हाला माहिती आहे. पोलिसांनी आता हे विचार सोडून द्यायला हवेत. पण, ते पाळत असलेल्या अंधश्रद्धेपासून कुणाचेही नुकसान होत नाही. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन होण्याचा प्रश्नच नाही. पण, यातून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याची मानसिकता वाढीस लागते. हे घातक आहे. पी. एस. खंडारे, राज्य सचिव (माध्यम विभाग), अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

चोरांचीही अंधश्रद्धा : अमावस्येची रात्र ही खास चोरी करण्यासाठी असतेच. चोरांसाठी ती देवाची खास उपलब्धी आहे, असा समज काही चोरांचा आहे. त्यामुळे ते अमावस्येच्या रात्रीच चोरी करतात. तसेच अनेक चोर्‍या या रात्री होतात असा समज आहे.
डोळस अधिकारी हतबल

पोलिस दलातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी डोळसपणे विचार करणारे आहेत. पण, अंधश्रद्धेच्या या परंपरा बदलण्यास त्यांना यश आले नसल्याचे चित्र आहे. परिणामी, त्यांच्या समोर टेबल वाजवणार्‍या कुण्या व्यक्तीवर स्टेशनमधील कुणी कर्मचारी रागावला तर तेही काही बोलत नाहीत.

असाही योगायोग : शहरातील जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत काही दिवसांपूर्वी एका सफाई कामगाराने आत्महत्या केली. पोलिसांनी र्मग दाखल केला. त्याच्या तीन दिवसांत याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत अजून दोन र्मग दाखल झाले. परिणामी, तीन र्मगचा कोटा पूर्ण झाला.