आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TB News In Marathi, Health, HIV, Divya Marathi, World TB Day

एकच निर्धार, आयुष्यात नको ‘क्षया’चा आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - क्षयरोग ही आरोग्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. क्षयरोगाला नियंत्रणात आणणे गरजेचे झाले आहे. कारण जगाच्या आकडेवारीत भारतात क्षयरोगाचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. दररोज पाच हजारांहून अधिक लोकांना क्षयरोग होत असून, दर 3 मिनिटाला दोन रुग्णांचे क्षयरोगाने मृत्यू होत असल्याचे भयावह वास्तव असून, 20 क्षयरुग्णांमध्ये एक एचआयव्ही बाधित रुग्ण दडला आहे, अशी माहिती क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ वसंत उन्हाळे यांनी दिली. सोमवारी 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला या आजाराविषयी विस्तृत माहिती दिली.


आधुनिक वैद्यकशास्त्रातील निदान व उपचारामुळे आज क्षयरोग पूर्णत: बरा होतो. 15 ते 55 वर्षे या कमावत्या वयोगटांतील व्यक्तींना हा आजार होत असल्यामुळे देशाची उत्पादन क्षमता कमी होते. तसेच कुटुंबाची व देशाची आर्थिक हानी होते. या रोगाशी लढा देताना माणसाने स्वत:च्या आरोग्याची, जीवाची, पैशाची, सामाजिक स्थानाची किंमत चुकती केली आहे. या आकडेवारीमुळे या रोगाचे गांभीर्य दिसून येते. क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षण हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. लोकसहभागाशिवाय कोणत्याही रोगाचे नियंत्रण शक्य नाही. क्षयरोगासंबंधित आरोग्य शिक्षणाचे मुख्य ध्येय क्षयरोगाची लक्षणे असणार्‍यांनी निदानासाठी आणि नियमित उपचारासाठी उद्युक्त करणे हे होय. क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. वर्षभरात औषध न घेणारा क्षयरुग्ण 1 ते 15 लोकांना क्षयरोगाचा संसर्ग पसरवू शकतो. म्हणून क्षयरोगाबाबत आरोग्य शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क असून, क्षयरोग मुक्त होणे हा प्रत्येक क्षयरुग्णाचा हक्क आहे. क्षयरोगाचा संसर्ग दुसर्‍या निरोगी व्यक्तीस होऊ नये, याची खबरदारी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.


आजाराची लागण
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. हा रोग हवेतून पसरतो. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जंतूमूळे हा रोग होतो. जेव्हा क्षयरुग्ण खोकलतो, बोलतो किंवा शिंकतो किंवा थुंकतो तेव्हा क्षयरोगाचे हे जंतू हवेत पसरतात. निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करून फुप्फुसावर मारा करतात.


लक्षणे
> दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवसाचा बेडकायुक्त खोकला
> सायंकाळी वाढत जाणारा ताप
> वजनात घट होणे
> भूक मंदावणे
> छातीतून खोकल्याद्वारे रक्त पडणे
> सतत छातीत दुखणे


निदान व उपचार
लक्षणे आढळल्यास संशयित रुग्णाची थुंकीची तपासणी केली जाते. आवश्यकतेनूसार क्ष-किरण तपासणी (एक्स-रे) आणि इतर तपासण्या केल्या जातात. तपासणीत थुंकी दूषित निघाल्यास त्याला डॉट्स औषधोपचार सुरू केला जातो.
डॉट्सचे औषध सुरू झाल्यानंतर थोड्याच दिवसांत रोगाचे लक्षणे कमी होऊन रुग्णाला बरे वाटू लागते. याचा अर्थ रोग पूर्ण बरा झाला असे नाही. रुग्णाला बरे वाटण्यासाठी नियमित व पूर्ण औषधोपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. डॉट्स औषधोपचाराने मी तर बरा होईलच. परंतु, इतरांनाही संसर्ग होऊ देणार नाही. हे माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे समजून करेल, असा निश्चय प्रत्येक क्षयरुग्णाने करावा.’’ डॉ. के. एम. संकपाळ, जिल्हा क्षयरोग अधिकारी, अकोला.