आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या परीक्षेवर यंदाही शिक्षकांचा बहिष्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सरकारने पूर्ण न केल्यामुळे या वर्षीही बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने घेतला आहे. मागील वर्षीही शिक्षकांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला होता.
2008-2009 पासून पदांना मान्यता देणे, विनाअनुदानित सेवा वरिष्ठ व निवड र्शेणीसाठी ग्राहय़ धरणे, कायम विनाअनुदानित तत्त्व रद्द करणे, विज्ञानाच्या परीक्षेचे पेपर स्वतंत्ररीत्या घेणे, 24 वर्षांच्या सेवेनंतर सर्वांना निवड र्शेणी, माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना त्वरित मान्यता व वेतन देणे यासारख्या 20 मागण्यांची पूर्तता शासन करत नसल्यामुळे शिक्षकांनी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. संजय देशमुख यांनी दिली आहे. 20 जानेवारी 2014 रोजी शिक्षकांच्या आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. या टप्प्यात शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निषेध मोर्चा काढला होता. मात्र, या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यामुळे 24 जानेवारीपासून शिक्षकांनी संबंधित प्राचार्यांना तसेच शिक्षण मंडळाला 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार घालणार असल्याचे सूचनापत्र देण्याचा कार्यक्रम आखला असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती प्रा. संजय देशमुख यांनी दिली. 6 फेब्रुवारीपासून शिक्षकांचा तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेवर बहिष्कार असणार आहे. जोपर्यत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. परीक्षेच्या काळातील आंदोलनाची जबाबदारी ही शिक्षकांची राहणार नाही, असे संघटनेने म्हटले आहे. मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी ‘याद करो सरकार’ असे आंदोलनही शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते. मात्र, शासनाने शब्द पाळला नसल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे प्रा. संजय देशमुख यांनी सांगितले.
असे होते आंदोलनाचे टप्पे
सप्टेंबर 2013 मध्ये धरणे आंदोलन
नोव्हेंबर 2013 शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन
डिसेंबर 2013 मध्ये नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा
20 जानेवारी 2014 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निषेध मोर्चा