आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घोडेगाव प्रकरणा’चा तपास गुन्हे शाखेकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- महसूल विभागाच्या संघटनेने पुकारलेल्या लेखणीबंद आंदोलनानंतर घोडेगाव अवैध माती उत्खनन मजूर बळी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुभाष माकोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

तहसीलदार सचिन पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिस प्रशासनाने अन्याय केला, अशी भूमिका महसूल विभागाच्या संघटनेने घेतली. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक निकेश खाटमोडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला.

पोलिसांनी केला ट्रॅक्टर जप्त
अवैध उत्खनन केलेल्या मातीच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर क्रमांक एमएच 30 जे 7186 चा वापर केला होता. तो विनायकराव ढोले यांच्या मालकीचा असून, पोलिसांनी जप्त केला आहे.

तलाठी केंद्रेंनी वाढवला होता तणाव
घोडेगाव येथील माती उत्खननादरम्यान, घडलेल्या अपघातानंतर उपस्थित ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर होता. या शिवाराचे तलाठी केंद्रेंनी गुरुवारी 24 एप्रिलला तहसीलदारांना या शिवारातून माती चोरी होत आहे, असे पत्र दिले होते. त्या पत्राच्या प्रती त्यांनी घटनास्थळी वाटून लोकांच्या भावना तीव्र केल्या. यादृष्टीनेही तपास व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रभारी तहसीलदारपदी गणेश पवार : दरम्यान, घडलेल्या प्रकारामुळे तेल्हार्‍याचे तहसीलदार सचिन पाटील हे दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार गणेश पवार यांना प्रभार दिला आहे. आज ते शहरात दाखल झाले.