अकोला- जिल्ह्यात बुधवार, 30 एप्रिल रोजी वादळीवार्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यामुळे शहराचे तापमान घसरले. 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान गुरुवारी 41.1 वर आल्याने नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला. बुधवारी दुपारी अकोला जिल्ह्यामध्ये 6.6 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली होती.
रात्रीचे सरासरी तापमान मात्र 25.2 अंश सेल्सिअस होते. गुरुवारी दुपारी ढगाळ वातावरण असल्याने तापमान तीन अंशांनी घसरले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होतील. यामुळे दमटपणा वाढण्याची शक्यता आहे.