अकोला - जिल्ह्यातीलशेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचे वावडे असल्याचे चित्र आहे. शासनाकडून दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते. दूध व्यवसाय करण्यात केवळ स्वतंत्र व्यक्ती समाविष्ट असल्याची वास्तविकता आहे.
राज्य किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून याचा कुठलाही पाठपुरावा केला जात नसल्याने दुग्ध उत्पादनावर याचा परिणाम होत आहे. दुधाळ जनावरांचे दूध काढणे त्याचा उपयोग घरगुती गरजेपुरता करून स्थानिक पातळीवर किरकोळ दुधाची विक्री करण्यापुरते दुधाचे उत्पादन ८० च्या दशकात व्हायचे. सुरुवातीच्या काळात शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत दुधापासून मिळणारे उत्पन्न याचा विचार करून शेतकरी या व्यवसायात यावेत, यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना प्रेरित करून त्यांना दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत गायी, म्हशींचे पालनपोषण केले. दुधाचे उत्पादन ज्या प्रमाणात वाढले, त्या प्रमाणात दूध उत्पादकांकडचे दूध स्वीकृती करण्यासाठी येणाऱ्या अडचणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेल्याने दुग्ध व्यवसायाला वाळवी लागल्याचे अल्पावधीतच पाहावयास मिळाले. दूध उत्पादनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयासह जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे प्रयत्न कमी पडले, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे दुग्ध उत्पादन व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली, जी आजपर्यंत कायम आहे.
दुग्ध व्यवसायाबाबत नाराजी
जिल्ह्यातीलशेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता एक दविस दुधाचा जोडधंदा म्हणून करणाऱ्या शेतकऱ्यांनी तर या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहेच. पण, नवीन शेतकरीसुद्धा या धंद्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहताना दिसत नसल्याचे चित्र आहे. नावीन्यपूर्ण योजनांची गरज दूध उत्पादन वाढीसाठी शासनातर्फे विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रयत्नही केले जातात. प्रत्येक गावात ते गटांना गायी, म्हशी, बकऱ्यांचे वाटप केले जाते. याकरिता मिळणारे अनुदान मात्र, तोकडे असल्याने अधिकाऱ्यांचेही हात टेकतात.
शेतकऱ्यांना दुधात ‘इंटरेस्ट’ नाही
दुग्धव्यवसाय करण्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इंटरेस्ट नसल्याचे दिसते. त्यामुळे आज जिल्ह्यातील केवळ १० टक्के शेतकरीच गाय, म्हैस, बकऱ्या पाळताना दिसतात. दूध उत्पादन आज महागडे झाले आहे. त्यामुळे या व्यवसायाकडे येण्यासाठी कुणी वळत नसल्याची प्रतिक्रिया निवृत्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिक मोरे यांनी दिली.