आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Names Of Irrigation Projects And Its Capacity

प्रकल्पांची नावे सिंचन क्षमता, २३२ हेक्टरची क्षमता; सिंचन केवळ २३ टक्केच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातमागच्या वर्षी झालेला कमी पाऊस पाणीपुरवठ्यासोबतच सिंचनावरदेखील परिणाम करणारा ठरला आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या एकूण ३३ प्रकल्पांमधून ३० हजार २३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असताना या वर्षी रब्बी हंगामात केवळ ६,७२१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. क्षमतेच्या केवळ २२.२३ टक्के जमीन सिंचनाखाली येणार असल्याने रब्बी हंगामात दरवर्षी होणारी कोट्यवधीची उलाढाल नीचतम पातळी गाठणार आहे.

अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच लाख ४३ हजार १०० हेक्टर आहे. यापैकी चार लाख ९६ हजार हेक्टर शेतीलायक क्षेत्र आहे. यापैकी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ३३ प्रकल्पांच्या माध्यमातून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाते. जिल्ह्यात सुरू असलेल्या बांधकामाधीन प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर सिंचनात अधिक वाढ होईल. त्यामुळेच जलप्रकल्प जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वाची कामगिरी बजावतात. एकीकडे नागरिकांची तहान भागवतानाच दुसरीकडे जमीन सिंचनाखाली आणली जाते. त्यामुळे पाऊस कमी झाला की सिंचनात कपात केली जाते.

२०१३ साली पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. निर्गुणा वगळता इतर प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा उपलब्ध झाला. त्यामुळेच रब्बी हंगामात केवळ ६,७२१ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जलसाठा कमी असल्याने ३३ पैकी केवळ २० प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. खरिपात शेतकऱ्यांना फटका बसला असताना रब्बीपासून वंचित राहावे लागत आहे. शेतकऱ्यांसमोर पुन्हा अडचणीं उभ्या राहू शकतात.

जलप्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला की, हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते, त्यामुळे गहू, हरभऱ्यासह विविध पिकांची पेरणी केली जाते. त्यामुळे रब्बी हंगामात कोट्यवधीची उलाढाल होते. परंतु, या वर्षी पाऊस कमी झाल्याने ही उलाढाल मंदावणार आहे. त्यामुळे याचा परिणाम बाजारावरही जाणवेल. मागील रब्बी हंगामात १९ हजार ९६७ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती, हे विशेष.