आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Plantation Will Be On The 28 Kilometers Way In Akola District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातील २८ किलोमीटर मार्गावर होणार वृक्षारोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोला सामाजिक वनीकरण विभागांतर्गत चार परिक्षेत्र येतात. या परिक्षेत्रांतर्गत रस्ता दुतर्फा लागवड, अत्याधुनिक रोपवाटिका, जल विविधता प्रकल्प स्मृतिवन आदी कामे प्रस्तावित करण्यात आली असून, ८० लाख अनुदानातून विविध कामांना गती देण्यात येणार आहे.
पावसाळ्याची चाहूल लागली असून, साधारणपणे जून महिन्यात सर्वत्र वृक्षारोपणास प्रारंभ होतो. त्यानुसार अकोला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपणाचे नियोजन केले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध रोपवाटिकांमध्ये सद्य:स्थितीत कडुनिंब, अमलतास, आवळा, बेल, गुलमोहर, कॅशिया, साग, सीताफळ, जांभूळ, पेरू, आंबा, चिकू, वड, पिंपळ, कडू बदाम, लिंबू आदींसह अनेक प्रजातींची रोपे राेपणासाठी तयार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडींतर्गत लोहारा ते अंदुरा या ११ किलोमीटरवर वृक्षारोपण होणार आहे.
तसेच येवता ते वाशिंबा १० किलोमीटरचा मार्ग सायखेड फाटा ते तेल्हारा या साडेसहा किलोमीटर मार्गावर वृक्षारोपण करण्यात येईल. या योजनेंतर्गत साडेसत्तावीस किलोमीटर मार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार असून, त्यासाठी १७ लाख ३२ हजार खर्च अपेक्षित आहे. जल विविधता प्रकल्पांतर्गत आखतवाडा येथील ब्रिटिशकालीन तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येत असून, त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. तसेच स्मृतिवन योजनेंतर्गत पाच रोपवाटिकांमध्ये १० हेक्टरचे स्मृतिवन निर्मितीचा प्रस्ताव आहे. यामध्ये पातूर तालुक्यातील नांदखेडशिव रोपवाटिका, बाळापूर तालुक्यातील बटवाडी खुर्द, बार्शिटाकळी तालुक्यातील मोझरी, मूर्तिजापूर तालुक्यातील धानोरा, तर अकोटमधील केळीवेळी रोपवाटिकेचा समावेश आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडींतर्गत या उपक्रमाला गती मिळत आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सुनील जयस्वाल यांनी दिली.
तीन रोपवाटिका होणार हायटेक
अकोला सामाजिक वनीकरण विभागांतर्गत चार परिक्षेत्र असून, त्यातील रोपवाटिका हायटेक होणार आहेत. यामध्ये अकोला परिक्षेत्रातील लोणी रोपवाटिका, मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील रोपवाटिका बाळापूर परिक्षेत्रातील बारादरी रोपवाटिकेचा समावेश आहे. या ठिकाणी सर्व अत्याधुनिक सुविधांसह रोपनिर्मिती होणार आहे, अशी माहिती उपसंचालक सुनील जयस्वाल यांनी दिली.