अकोला - मलकापूर येथील सर्मथनगरात घरफोडी झाल्याची घटना रविवारी सकाळी उजेडात आली. यामध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रप्रकाश मदनगोपालजी जाजू (69) हे 27 फेब्रुवारी रोजी परिवारासह घराला कुलूप लावून राजस्थान येथे देवदर्शनासाठी गेले होते. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च असे तीन दिवस त्यांच्या घरी कुणीही नव्हते. अज्ञात चोरट्यांनी चंद्रप्रकाश मदनगोपालजी जाजू हे घरी नसल्याची संधी साधून या तीन दिवसांच्या दरम्यान त्यांच्या घराच्या ग्रिलचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. नंतर घराच्या आतील दाराचे कुलूप तोडले. त्यांनी 50 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत एक लाख 25 हजार रुपये, 30 हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि नगदी एक लाख 62 हजार रुपये असा एकूण तीन लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
2 मार्च रोजी जाजू कु टुंबीय घरी परत आल्यानंतर त्यांना घराचे दार उघडे असल्याचे दिसून आले तसेच घरात सामानाची फेकाफेक केल्याचे दिसून आले. त्यांनी खदान पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वात पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी घरातील चोरट्यांच्या हाताचे ठसे आणि इतर पुरावे गोळा केले. याप्रकरणी चंद्रप्रकाश मदनगोपालजी जाजू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर गरुड करत आहेत.