बोरगावमंजू- येथे खांबोरा सुधारित चार गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाण्याची टाकी बांधली. मात्र, ती बोरगाववासीयांसाठी शोभेची वस्तू बनली आहे. याबाबतचे वृत्त २२ मे २०१५ रोजी "दिव्य मराठी'च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. बोरगाव, निपाणा, कानशिवणी, सुकळी या चार गावांचा या योजनेत समावेश असून, चुकीच्या डिझाइनमुळे बोरगावमंजूतील देशमुखपुरा, जैनपुरा, मुस्लिमपुरा, बौद्धपुरा, धनगरपुरा या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
सध्या महाराष्ट्र शासन पाणीटंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपये खर्च करत असून, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे बोरगाववासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बोरगावात एकूण वॉर्ड असून, प्रत्येक वॉर्डाची लोकसंख्या ते हजारांच्या जवळपास आहे. प्रत्येक वाॅर्डात ६३ एमएम व्यासाची पाइपलाइन असल्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. २०३० पर्यंत पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असलेल्या ह्या योजनेने आताच दम तोडला आहे. याच वास्तवाचा बोरगाववासीयांना सामना करावा लागत आहे.
खांबोरा सुधारित चार गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी पाच कोटी ३३ लाख १६ हजार रुपये खर्च केला असून, या योजनेला २५ जून १९९८ ला तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. या योजनेची दैनंदिन देखभाल जिल्हा परिषद, अकोला यांच्याकडे असल्याने ग्रामपंचायत प्रशासन या समस्येकडे लक्ष देत नाही.
जिल्हा परिषद प्रशासनाचा कानाडोळा : पाचकोटी ३३ लाख खर्चून तयार करण्यात आलेल्या योजनेमध्ये पाइपलाइनचे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. याकडे जिल्हा परिषद प्रशासनही कानाडोळा करत आहे.
चौकशी करू
- बोरगावमंजू येथील पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकाराची निश्चितच चौकशी करण्यात येईल. नागरिकांना पाणी मिळेल अशाप्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.
सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा.
अन्यथा आंदोलन करू
- नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होत असून, सध्या पाणी प्रश्न पेटला आहे. बोरगावातील पाइपलाइनचे काम करणाऱ्या ठेकेदारावर ठोस कारवाई करावी. आम्हा नागरिकांची पाणी समस्या निकाली काढावी. अन्यथा तिव्र आंदोलन करू.
गजानन धामोळे, रेणुकानगर, बोरगावमंजू