आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद : प्रज्ञा, ऐश्वर्या मृत्यूनंतरही पाहणार जग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिसोड (जि. वाशिम) - मैत्री दिन साजरा करण्यासाठी गेलेल्या प्रज्ञा मोरे, शिवाणी साळेगावकर आणि ऐश्वर्या गवळी (सर्वांचे वय 15 वर्ष) या तीन जीवलग शाळकरी मैत्रिणीचा रविवारी शेततळ्यात बुडून करुण अंत झाला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. मात्र, प्रज्ञा आणि ऐश्वर्या यांच्या पालकांनी आपले दु:ख बाजूला सारत त्यांचे नेत्रदान घडवून आणले. त्यामुळे या दोघी मृत्यूनंतरही हे जग पाहू शकतील. त्याशिवाय त्यांच्यामुळे चार अंधांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत पेटणार आहे.

या तिघीही पहिल्या वर्गापासून एकमेकांच्या सख्ख्या मैत्रिणी. रविवारी ‘फेंड्रशिप डे’ साजरा करावा म्हणून प्रज्ञा आणि शिवाणी या दोघी मालेगाव रस्त्यावर असलेल्या ऐश्वर्याच्या शेतातील घरी गेल्या. तिघींनीही दुपारी एकत्रित वनभोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर शेतात फेरफटका मारला. ऐश्वर्याच्या वडिलांचे आणखी शेत करडा रस्त्यावर आहे. त्या ठिकाणीही या तिघी दुपारी दोन वाजतापर्यंत जाऊन आल्या. परत ऐश्वर्याच्या फार्म हाउसवर आल्यानंतर त्यांनी अल्पोपाहार केला. परत त्या शेततळ्यावर जाऊन बसल्या. या वेळी शेतात या तिघींशिवाय कुणी नव्हते.

याचवेळी शेततळ्यात असलेल्या प्लास्टिकच्या गुळगुळीत आवरणावरून कुण्यातरी एकीचा पाय घरसला असावा आणि तिला वाचवण्यासाठी इतर दोघींनी शेततळ्यामध्ये उडी घेतली असावी. त्यामुळे या तिघींचाही बुडून मृत्यू झाला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ऐश्वर्याचे काका वसंता गवळी हे आपल्या अन्य एका शेतकरी मित्रांसह शेततळ्याकडे आले. त्यांना भिंतीवर चप्पल, रुमाल आणि गॉगल दिसल्याने शंका आल्यामुळे त्यांच्या शेतातील अन्य व्यक्तीने पाण्यात उडी मारून शोध घेतला असता या तिघींचे मृतदेह आढळून आले.

साळेगावकरांना खंत
आपल्या मुलीच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारत मोरे व गवळी कुटुंबियांनी नेत्रज्ञानाचा निर्णय घेऊन चार अंधांना दृष्टीने देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिसरी मृत मुलगी शिवाणी हिचे शवविच्छेदन झाल्याने तिचे नेत्रदान करता आले नसल्याची खंत शिवाणीचे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.