आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना उपजिल्हाप्रमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अकोला बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मलकापूरचे सरपंच, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश्वर देशमख यांच्या हत्येनंतर शिवसेनेने शनिवारी (दि.24) अकोला बंद पुकारला असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी दिली आहे. दरम्यान देशमुख यांच्या हत्येला अनेक कंगोरे असल्याचे समोर येत आहे. मलकापूर ग्रामपंचायतमध्ये विकासाचे अनेक ‘वाटेकरी’ पुढे येत होते. त्यातच अनेक राजकीय पक्षांनी मलकापूर ग्रामपंचायतकडे लक्ष केंद्रित केल्याने राजकीय चढाओढही सुरू आहे. या कारणांमुळे हे हत्याकांड घडल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे.


मलकापूर ग्रामपंचायतमध्ये जवळपास 50 टक्के औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील उद्योग येतात. त्या उद्योगांकडून ग्रामपंचायतला महसूल स्वरूपात कर प्राप्त होतो तसेच महापालिकेच्या विविध करांपासून सुटका मिळण्यासाठी आणि जादा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी गत काही दिवसांपासून शहरातील अनेक बिल्डरांनी मलकापूर ग्रामपंचायत हद्दीत बांधकामे सुरू केली. या सर्वांमधून ग्रामपंचायतला मोठय़ा प्रमाणात महसूल प्राप्त होतो. मलकापूर हे शहराला लगतच असल्याने ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांनी मलकापूर ग्रामपंचायतकडे लक्ष केंद्रित केले आहे.


शहर हद्दवाढीला होता विरोध
अकोला शहर हद्दवाढीला सरपंच संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर देशमुख यांनी विरोध दर्शवला होता. अकोला शहर हद्दवाढीच्या मुद्दय़ावर ‘दिव्य मराठी’ने 1 ऑगस्टला ‘टॉक शो’ चे आयोजन केले होते. यामध्ये उपस्थित राहून सिद्धेश्वर देशमुख यांनी अभ्यासपूर्ण विविध मुद्दे मांडून हद्दवाढ केल्यास गावाचा सत्यनाश होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. अकोला महापालिका स्थापनेच्या वेळी शहरालगतच्या 12 गावांचा संपूर्ण व इतर गावांचा अंशत: समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.


मलकापुरातील हत्याकांड घटनेवर दृष्टिक्षेप..
मागील 10 वर्षांपासून अकोल्यापासून जवळच असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतमध्ये राजकीय धुसफूस सुरू आहे. ग्रामपंचायत हद्दीत चार महिन्यांपूर्वी केबल टाकण्याचे काम सुरू होते. केबल टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले. या खड्डय़ांमुळे सांडपाण्याची समस्या निर्माण झाली. या समस्येचे भांडवल केले गेले. या घटनेवरून वादही झाला. वादाचे पर्यवसान सशस्त्र हाणामारीत झाले. या घटनेत बबलू मार्कंडवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांनाही गोवण्यात आले होते. या घटनेनंतर राजकीय वैमनस्यात वाढ झाली. या वैमनस्यातूनच हे हत्याकांड घडल्याची शक्यता राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे.


हत्येचा तीव्र निषेध
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा शिवसेनेतर्फे निषेध करतो. या घटनेतील आरोपींच्या अटकेची मागणी शिवसैनिक करीत आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा झाला किंवा आरोपींना अभय मिळाल्यास ते सहन करणार नाही.’’ श्रीरंग पिंजरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख.


गुन्हेगारीचा शिरकाव
अकोल्यातील राजकारणातही गुन्हेगारीकरणाचा शिरकाव झाला आहे. राजकीय मतभेद इतक्या खालच्या स्तरावर जायला नको. राजकारणातील वाढती गुन्हेगारी घातक आहे. या गुन्हेगारीला आळा बसावा. या घटनेचा जाहीर निषेधच.’’ डॉ. अशोक ओळंबे, शहराध्यक्ष, भाजप, अकोला.


अत्यंत दु:खदायक
राजकारणातील मतभेद इतक्या खालच्या पातळीवर जाणे, हे चुकीचे आहे. मलकापूर येथे घडलेली घटना अत्यंत दु:खदायक आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आरोपीला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.’’ अजय तापडिया, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष


निंदनीय, निषेधार्ह
राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणार्‍या एका युवा नेत्यासोबत अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या घटनेचा जितका निषेध केला जाईल, तेवढा कमीच होईल. अशा प्रकारच्या घटनांना आता आळा बसायला हवा, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.’’ बाबाराव विखे पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, अकोला.
राजकारणातील गुन्हेगारीला आळा बसावा; नेत्यांची प्रतिक्रिया


आरोपीला अटक करावी
प्रत्येक क्षेत्राचे गुन्हेगारीकरण होत आहे. त्याला राजकारणही अपवाद नाही. त्याचा दुष्परिणाम आता दिसून येत आहे. राजकीय द्वेषातून गोळीबार होऊन एका नेत्याची हत्या होणे, हे निंदनीय आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करावी. अशा घटनेचा मी निषेध करतो.’’ संजय धोत्रे, खासदार


दुर्दैवी घटना
राजकीय नेत्याची गोळी झाडून हत्या होणे, ही दुर्दैवी घटना आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राजकारण पैसा कमवण्याचा धंदा झाल्याने त्याचे गुन्हेगारीकरण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. या घटनेचा निषेध करतो.’’ अँड. प्रकाश आंबेडकर, माजी खासदार