आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो विद्यार्थी आज घेणार शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-अकोला शहरातील शाळांमध्ये शुक्रवारी, 24 जानेवारीला हजारो विद्यार्थी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची शपथ घेऊन दैनिक ‘दिव्य मराठी’चे राष्ट्रध्वज सन्मान अभियान प्रत्यक्षात उतरवतील.

शहरातील बहुतांश शाळा या अभियानात सहभागी झाल्या आहेत. गणतंत्रदिनी रस्त्यावर विकत घेतलेल्या प्लास्टिक व इतर राष्ट्रध्वजांची नंतर होणारी अवहेलना ही सार्वत्रिक चिंतेची बाब झाली आहे. राष्ट्रध्वजाचा हा अपमान रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ‘दिव्य मराठी’ने राष्ट्रध्वज सन्मान अभियान हाती घेतले आहे. या अभियानामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात नक्कीच यश येईल, असा विश्वास मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

दोन टप्प्यांत हे अभियान राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील जास्तीत जास्त शाळांशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. याशिवाय विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या राष्ट्रध्वजाविषयीच्या भावना वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. आणखी दोन दिवस जास्तीत जास्त नामवंतांचे आवाहन वाचकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. संपर्क करण्यात आलेल्या सर्वच शाळा या अभियानात सहभागी झाल्या आहेत.

शुक्रवारी 24 जानेवारी रोजी दुसर्‍या टप्प्यात सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना आयुष्यभर राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची शपथ देतील. उद्या शपथ घेणारे विद्यार्थीनंतर आयुष्यभर राष्ट्रध्वजाचा सन्मान राखतील आणि इतरांनाही सन्मान राखण्याची विनंती करतील.

शाळांना आवाहन

संपर्काअभावी अभियानात सहभागी न होऊ शकलेल्या शाळांनी शुकवारी प्रार्थनेच्या वेळी मुख्य अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित केलेली शपथ विद्यार्थ्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. शहरातील नामवंतांनीही अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रध्वजाची अवहेलना थांबवण्यासाठी ‘दिव्य मराठी’चा पुढाकार

मुलांकडून भाबडेपणाने किंवा अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होत असतो. राष्ट्रध्वज आपली अस्मिता आहे. त्याचा चुकूनही अवमान होता कामा नये. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान रुजवण्यासाठी राबवण्यात येणारे अभियान प्रशंसनीयच आहे. यानिमित्त केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही मी आवाहन करतो, की आपल्याकडून किंवा पाल्यांकडून राष्ट्रध्वजाचा अजाणतेपणीसुद्धा अवमान होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. उदय वझे, सृष्टीवैभव, अकोला.

हे अभियान विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अस्मिता बिंबवेल

राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असून, ही अस्मिता जपण्याचे संस्कार बालवयापासून होणे गरजेचे आहे. दैनिक दिव्य मराठीच्या या अभियानाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अस्मिता बिंबवली जाणार आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक असून, संस्कारांमुळे राष्ट्रीयत्वाची भावना व राष्ट्राभिमान जागृत होईल. फुटबॉलचे मैदान असो किंवा इतर कुठेही गदारोळ झाल्यास त्या देशाचे राष्ट्रगीत वाजवल्यानंतर सर्वजण शांत होतात, ती परंपरा मुलांमध्ये रुजवणे गरजेचे आहे. - सीमा शेट्ये, साहित्यिक.