अकोला- नगररचना विभागाने 10 जूनला दुर्गा चौक आणि रामनगर परिसरात निर्माणाधीन इमारतीचे अनधिकृत बांधकाम पाडले. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत: पाडण्याची हमी बॉन्ड पेपर लिहून दिल्याने महापालिकेने बांधकाम पाडण्याची कारवाई थांबवली.आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या निर्माणाधीन बांधकामांचे काम मंजूर नकाशानुसार आहे की नाही, याची पाहणी केली होती. जवळपास सर्वच्या सर्व निर्माणाधीन बांधकामांमध्ये अनधिकृत बांधकाम आढळून आले. या सर्वांना आयुक्तांनी नोटीस बजावल्या असून, अनधिकृत बांधकाम पाडणे प्रशासनाने सुरू केले आहे. दुर्गा चौक परिसरातील मौजे अकोला नझूल शिट क्रमांक 64 ए, भूखंड क्रमांक 4/2 या जागेवर सुशीलकुमार खोवाल यांनी बांधकाम सुरू केले आहे.
मंजूर नकाशापेक्षा 87 चौरस मीटरचे बांधकाम अनधिकृत आढळून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसला सुशीलकुमार खोवाल यांनी उत्तर दिले होते. मात्र, अनधिकृत बांधकाम तसेच प्लॉटच्या पश्चिम बाजूस तीन मीटर, उत्तर बाजूस तीन मीटर, दक्षिण बाजूस 1.50 चौरस मीटर समास सोडणे गरजेचे असताना सुशीलकुमार खोवाल यांनी पश्चिम बाजूस 2.2 मीटर, तर उत्तर व दक्षिण बाजूस समास सोडलाच नाही. त्यामुळे नगररचना विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 53 अन्वये अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली.अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या दरम्यान सुशीलकुमार खोवाल यांनी बांधकाम न पाडण्याची विनंती केली. परंतु, अखेर शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर 15 दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडण्याची हमी सुशीलकुमार खोवाल यांच्या कुटुंबीयांनी लिहून दिल्याने नगररचना विभागाने ही कारवाई थांबवली.
..तर सायंकाळी रामनगर भागातील मौजे उमरखेडमधील सर्वे क्रमांक 5, 15, 16, भूखंड क्रमांक 110 मध्ये नीलेश दायमा यांचे बांधकाम सुरू आहे. नीलेश दायमा यांनी महापालिकेची नोटीस मिळाल्यानंतर अनधिकृत बांधकाम स्वत: काढले.
मात्र, पूर्व, पश्चिम, उत्तर बाजूस प्रत्येकी 1.50 मीटर तर दक्षिण बाजूस तीन मीटर समास सोडणे गरजेचे असताना केवळ 0.90 मीटर समास सोडल्याने नीलेश दायमा यांचे तीन पिल्लर नगररचना विभागाने जमीनदोस्त केले, तर जिना स्वत: पाडण्याची हमी लेखी स्वरूपात दिल्याने नीलेश दायमा यांचे जिन्याचे काम पाडण्याची कारवाई थांबवली.