आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सुरक्षा सप्ताहांतर्गत पोलिस विभागाने आज सलग दुसर्‍या दिवशी शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी दंड वसूल केला.

वाहतूक सुरक्षा सप्ताहांतर्गत पोलिस विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार वाहनांची तपासणी करून नियम मोडणार्‍या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. खदान पोलिसांनी खदान चौकात ऑटोरिक्षा व दुचाकींवर कारवाई केली. या वेळी खदानचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी 60 ऑटोरिक्षांवर कारवाई केली.

ऑटोरिक्षा, दुचाकीचालकांचे कागदपत्र तपासले. कागदपत्र दाखवण्यात असर्मथ ठरणार्‍या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. शहर कोतवाली पोलिसांनी कोतवाली चौकात वाहनधारकांवर कारवाईची मोहीम राबवली. या वेळी शहर कोतवालीचे ठाणेदार जगदीश गायकवाड उपस्थित होते. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून राबवलेल्या मोहिमेमुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेक वाहनधारकांनी पोलिसांशी वादावादीदेखील केली.

अनेकांनी काढला पळ
वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू असताना, अनेक वाहनधारकांनी पळ काढला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही वाहनधारक थांबले नसल्याचे चित्र केलेल्या कारवाईच्या ठिकाणी होते.

पोलिसांचाही कारवाइचा देखावा
सुरक्षा सप्ताहांतर्गत राबवलेल्या मोहिमेत पोलिसांनी देखावा केल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी अवैध वाहतूक सुरू आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली नाही. केवळ आपल्या पोलिस ठाण्यासमोर उभे राहून कारवाई करण्यात पोलिसांनी धन्यता मानल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.