आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाड्या ‘लेट’; प्रवाशांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मंगला एक्स्प्रेसच्या अपघातानंतर विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येत आहे. मुंबईकडे जाणार्‍या व येणार्‍या गाड्या उशिराने धावत असल्यान्ने प्रवाशांचे हाल होत आहेत. सोमवारपर्यंत वाहतूक सुरळीत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, रविवारी मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेस रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.

निजामुद्दीन ते एर्नाकुलम मार्गावर धावणार्‍या मंगला एक्स्प्रेसला शुक्रवारी घोटीजवळ अपघात झाल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक कोलमडली होती. नागपूरकडून मुंबईकडे जाणार्‍या गाड्या मनमाड, दौंड, पुणे, कल्याण मार्ग वळवण्यात आल्या. अपघातानंतर एक मार्ग शुक्रवारी मध्यरात्री सुरळीत करण्यात आला़ दुसरा मार्ग शनिवारी सकाळी पूर्वपदावर आला़ मात्र, या अपघाताचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम अद्यापही जाणवत आहे. शनिवारी नागपूरहून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेस 15 तास 35 मिनिटे उशिराने धावत होती. अकोला रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री 9.05 नियोजित वेळ असताना ही गाडी रविवारी दुपारी 12.40 वाजता अकोल्यात दाखल झाली. त्यामुळे रविवारी रात्री मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेसही उशिराने धावत आहे. शनिवारी ही गाडी आठ तास उशिराने धावली.

एसटीची ‘चांदी’
तातडीने प्रवास करण्यासासाठी अनेकजण एसटी बसेसकडे वळले. वर्धा, नागपूर,अमरावती, बुलडाणा, औरंगाबाद, नाशिक, भुसावळ, जळगाव खान्देश, पुण्याकडे धावणार्‍या बसेसमध्ये शुक्रवारपासून वाढलेली प्रवासी संख्या आजही कायम होती. परिणामी एसटीला चांगली मिळकत होत आहे.

प्रवाशांची आर्थिक लूट
मुंबईकडे जाणार्‍या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांनी एसटी बस व खासगी आराम बसेसचा आधार घेतला. दोन दिवसांपासून एसटी आणि खासगी आराम बसेसच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. याचा फायदा घेत काही खासगी आराम बसेसच्या मालकांनी भाड्याच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.