आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीबहाद्दरांचा हैदोस; बिल्डर्स धास्तावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे बिल्डर सध्या दहशतीमध्ये आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यू तापडियानगरमध्ये काम करण्यास त्यांना खंडणीबहाद्दरांचा मोठा त्रास होत आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असल्यामुळे पोलिस तक्रारीच्या फेर्‍यात वेळ दडवणे परवडणारे नाही. त्याचा फायदा घेत खंडणीबहाद्दरांचे फावले आणि आता हेच खंडणीबहाद्दर बिल्डरांच्या जीवावर उठले आहेत. याबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना बिल्डर म्हणाले की, खंडणीबहाद्दरांनी कर्माचा मार्ग निवडला, तर त्यांना आम्ही ठेकेदारीसुद्धा देऊ.

वर्गणी मागणार्‍यांची मजल आता खंडणी मागण्यापर्यंत गेली आहे. सुरुवातीला बिल्डरांनीच या खंडणीबहाद्दरांना वर्गणी म्हणून पैसे दिल्याने खंडणीखोरांची हिंमत वाढली आहे. खंडणी बहाद्दरांच्या दहशतीमुळे अनेक बिल्डरांनी काम थांबवले आहे. याबाबत बोलते केले असता बिल्डर म्हणाले की, खंडणीबहाद्दरांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून त्यांनी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, लेबर सप्लायर्स किंवा ठेकेदारीचा मार्ग निवडावा, त्यांना आम्ही काम देऊ.

बांधकाम व्यवसायामध्ये बिल्डरांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असते. त्यामुळे कुणी पाच-दहा हजार मागत असेल, तर डोक्याला ताण नको म्हणून बिल्डर पैसे देतात. मात्र, खंडणीखोरांनी आता हिंसेचा मार्ग स्वीकारला आहे. एकाच कामासाठी अनेक जण खंडणी मागतात. त्यामुळे संघर्ष होतो. परिणामी, पैसे न दिल्यास स्लॅब पाडणे, मजुरांना धमकावणे आदी प्रकार सर्रास घडत आहेत. गेल्या महिन्यामध्ये न्यू तापडियानगरमध्ये बिल्डरांना खंडणी मागितल्याचा प्रकार शिगेला पोहोचला. त्याचे रूपांतर तलवार हल्ल्यापर्यंत झाले. निमित्त होते, किती जणांना खंडणी द्यायची म्हणून. मात्र, यापूर्वी कधी बिल्डरांनी खंडणीबहाद्दरांविरोधात पोलिसात तक्रार दिली नाही. शेवटी त्यांनी रामदासपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. त्यात काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बिल्डरांना असुरक्षित वाटत असल्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आणि खंडणीबहाद्दरांच्या दहशतीचा पाढा वाचला. मात्र, तक्रारी नसल्यामुळे कारवाई कशी करणार, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकल्याने त्यांनी बिल्डरांना तक्रारी करण्यासाठी पुढे येण्याचे सांगून बिल्डरांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
पोलिस म्हणतात, बिल्डर्सनी खंडणीबहाद्दरांचे लाड पुरवू नयेत
खंडणी बहाद्दरांवर कारवाई का केल्या जात नाही, यासंदर्भात काही पोलिसांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ते म्हणाले की, अनेक वेळा खंडणीखोरांना आम्ही खंडणीच्या आरोपाखाली किंवा कोणत्या तरी गुन्हय़ात आत टाकतो. तोच आरोपी पुन्हा बाहेर येण्यासाठीसुद्धा बिल्डरांना पैसे मागतो आणि बिल्डर पैसे देतातही, अशा अनेक घटना घडत असतात. त्यासाठी बिल्डरांनी खंडणीखोरांचे लाड पुरवणे थांबवावे. तक्रारी नसल्यामुळे आम्हाला कारवाई करता येत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. बर्‍याचदा बिल्डरही पोलिसांकडे जाण्याचे टाळत असल्यामुळे खंडणी बहाद्दरांचे चांगलेच फावते आहे. त्यामुळे बिल्डरांनी त्रास देणार्‍या खंडणीबहाद्दरांबद्दल पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कारवाई न होण्याची बिल्डर्सना भीती
पोलिसात तक्रार दिली, तर पोलिस योग्य कारवाई करणार नाही, उलट पोलिसात तक्रार का केली म्हणून आपणास त्रास होईल. या उद्देशाने बिल्डर पोलिसात तक्रार करत नाहीत. कारण दोन दिवस जरी काम थांबले, तर मोठे नुकसान होते, ही भीती बिल्डरांमध्ये आहे.

विकासाला खीळ बसली
सर्वाधिक बांधकाम न्यू तापडियानगरमध्ये होत आहे. या भागातच खंडणीबहाद्दरांनी धुमाकूळ घातला आहे. खंडणी न दिल्यास अनेक वेळा स्लॅब पाडण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात आता बिल्डर नवीन काम करण्यास धजावत नसून, कामाच्या गतीवर परिणाम झाल्याने येथील विकासाला खीळ बसली आहे.