आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tutoring Classes In The Director's Inhuman Student Beaten

शिकवणी वर्गात संचालकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-महाविद्यालयातील प्रात्यक्षिकाला हजेरी लावण्यासाठी शिकवणी वर्गाला दांडी मारल्यामुळे संतप्त झालेले शिकवणीवर्ग संचालक प्रा. वसीम चौधरी यांनी आयएमए हॉलमधील त्यांच्या शिकवणी वर्गात एका विद्यार्थ्याला काल बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सिव्हिल लाईन पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रा. वसीम चौधरी यांना अटक केली आहे.
अमानुष मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव निशिकांत तामसे (17) असे आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरएलटी महाविद्यालयात अकरावीला शिकत असलेल्या निशिकांतने प्रा. शेख वसीम शेख जमील चौधरी (वय 30, रा. आझाद कॉलनी) यांच्याकडे रसायनशास्त्राची शिकवणी लावली आहे. सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या आयएमए हॉलमध्ये सकाळी 10 ते 11 आणि दुपारी 4 ते 5 अशा दोन बॅचमध्ये प्रा. चौधरी खासगी शिकवणी वर्ग चालवतात. यापैकी दुसरी बॅच सुरू असताना शिकवणी वर्गात प्रा. वसीम यांनी निशिकांतला अक्षरश: बदडून काढले.
28 जानेवारीला सकाळी 9.30 ते 10.30 दरम्यान रा.ल.तो. महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्रात्याक्षिक असल्याने निशिकांत त्यावेळेत महाविद्यालयात गेला होता. त्यामुळे काल तो शिकवणी वर्गाच्या दुपारच्या बॅचला गेला होता. सकाळच्या बॅचला गैरहजर राहिल्यामुळे प्रा. वसीम चौधरी यांचा राग अनावर झाला. त्यांनी निशिकांतला जवळ बोलावून नाव विचारले आणि पाठमोरे उभे राहण्यास सांगून फायबर पाइपने मागून मारहाण सुरू केली. या बेदम मारहाणीने तो भोवळ येऊन खाली कोसळला. त्याला त्याच्या मित्रांनी जवळच्या एका खाजगी इस्पितळात नेले. निशिकांतच्या शरीरावर फायबल पाइपने झालेल्या मारहाणीचे वळ उमटले आहेत.
मारहाणीचा प्रकार असल्याने इस्पितळाने आज सकाळी याची सूचना सिव्हिल लाईन पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांनी लगेच इस्पितळात धाव घेऊन निशिकांतचे बयाण नोंदवून घेतले. जखमी निशिकांतच्या बयाणावरून सिव्हिल लाईन पोलिसांनी सायंकाळी 6 च्या सुमारास प्रा. वसीम चौधरी यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक 38/14 भादंवि कलम 324 नुसार गुन्हा नोंदविला. त्यानंतर पावणे आठच्या सुमारास पोलिसांनी प्रा. चौधरी यांना अटक केली. लगेच पोलिसांनी प्रा. चौधरी यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली.
आमचा दोष नाही
आय. एम. ए. नेहमी सामाजिक बांधीलकी जपून उपक्रम राबवते. याचा कुठलाही मोबदला घेत नाही. ज्ञानदानात सहभाग घ्यायचा म्हणून आम्ही क्लासेस चालवण्यासाठी प्रा. वसीम चौधरी यांना जागा दिली. विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान व्हावे, असे आम्हाला कधीही वाटले नाही. या प्रकरणात आमचा काहीही दोष आहे, असे वाटत नाही. डॉ. प्रकाश आहेर, अध्यक्ष, आयएमए संघटना
घृणास्पद प्रकार
प्रा. वसीम चौधरी यांनी माझ्या मुलाला शिकवणी वर्गात केलेली मारहाण घृणास्पद आहे. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. मी देखील शिक्षक आहे. मात्र, मारहाण तर सोडाच विद्यार्थ्यांना कधी अपशब्द देखील वापरला नाही. मारहाणीनंतर प्रा. चौधरींनी निशिकांतच्या प्रकृतीची साधी चौकशी करण्याची माणुसकीदेखील दाखवली नाही. निशिकांतला इस्पितळात नेल्यावर त्याच्या मित्रांनी या प्रकाराची माहिती मला दिली. भानुदास तामसे, निशिंकातचे वडील
आरोपी अटकेत
विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून आरोपी प्रा. वसीम चौधरी यांना अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकाश सावकार, ठाणेदार,
सिव्हिल लाइन पोलिस ठाणे.
काळिमा फासणारी घटना :
खासगी शिकवणी वर्गाचे संचालक प्रा. वसीम चौधरी यांनी निशिकांतला केलेली मारहाण शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून, हा प्रकार अशोभनीय असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.