आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Week\'s Time The City Water Supply And. Ambedkar Light

शहराला आठवड्यातून दोन वेळ पाणीपुरवठा - अँड. प्रकाश आंबेडकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-अकोला शहराला आता आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होईल. याबाबतचे नियोजन येत्या आठवड्यात जाहीर करू. पुढील महिन्यापासून दररोज पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात येईल. महापालिका निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता म्हणून हे पाऊल उचलल्याची माहिती महान जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापौर ज्योत्स्ना गवई, प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे उपस्थित होते.
नव्याने लावलेल्या दोन एअर सर्किट ब्रेकरचा प्रारंभ आज भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते महान येथे कळ दाबून करण्यात आला. महान जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक नव्या सुविधांची माहिती घेऊन याची अंमलबजावणी त्वरित करण्याची सूचना अँड. आंबेडकर यांनी महापालिका अभियंता अजय गुजर, प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांना दिल्या. जनतेला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, पुरेसा पाणीसाठा असल्याने नियमित पाणीपुरवठा करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
नळाची अवैध जोडणी वैध करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. नाहीतर त्यांना दंड आकारावा लागेल. पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला मोठय़ा प्रमाणात निधीची गरज असते. त्यासाठी जनतेने पाणीपट्टी नियमित भरणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा करण्याकरिता विस्तारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यात प्रत्येक घरात पाण्याचे मीटर लावण्याची तरतूद आहे. नळजोडणी वैध करण्यावर प्रशासनाचा भर राहील, असे ते म्हणाले. यावेळी भारिप-बमसंचे नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, गजानन गवई, गौतम गवई, र्शीकांत ढगेकर, अजय गुजर, नीलेश बावने उपस्थित होते.
खासदारांमुळे विकास प्रलंबित
खासदार संजय धोत्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांमुळे शासनाने भूमिगत गटार योजनेत 21 त्रुटी काढल्या. त्यामुळे भूमिगत गटार योजना अडकली झाली आहे. त्यांच्याच प्रश्नांमुळे उपमुख्यमंत्र्यांनी 100 एमएलडीची योजना 60 एमएलडी केली. परिणामी भविष्यात पुन्हा नवी भूमिगत गटार योजना आणावी लागेल. अशीच परिस्थिती गायगावच्या रेल्वे ओव्हर ब्रिजची आहे. हा ब्रिज 1992 मध्येच मंजूर झाला. त्यामुळे यासाठी निधी आणल्याचा दावा फसवा आहे, असा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला.
असा होईल पाणीपुरवठा
या आठवड्यापासून महिनाभर अकोला महापालिका सप्ताहातून दोन दिवस अर्थात दर तिसर्‍या दिवशी पाणीपुरवठा करणार आहे. पाण्याचा दबाव जलवाहिनी सहन करत असल्याचे दिसून आल्यास पुढील महिन्यापासून दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधीची तरतूद झाली आहे, अशी माहिती प्रभारी आयुक्त उत्कर्ष गुटे यांनी दिली.
विकासाचे 41 कोटी मार्गी
महापालिका हद्दीतील विकासकामांसाठी आलेले 26 कोटी व अतिवृष्टीने बाधित रस्त्यांसाठी आलेले 15 कोटी असे 41 कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निधीसाठी महापालिकेला वाटा उचलण्याची गरज नाही. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांत या निधीतून शहरात विकासकामे करण्यात येतील, असे अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.