आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Construction Issue At Akola, Divya Marathi

सव्वा लाख चौरस फूट बांधकाम अनधिकृत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका हद्दीत झालेल्या पाहणीत सव्वालाख स्वेअर फूट बांधकाम अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे बड्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये अनधिकृत बांधकामांबाबत खुलासा झाला. बांधकामाचा किमान दर 2500 प्रती चौरस फूट गृहीत धरल्यास, या अनधिकृत बांधकामाचे मूल्य 32 कोटींच्या घरात जाते. शहरातील 152 बांधकामांचे प्रकल्प किंमत काढल्यास किमान 500 कोटींची बांधकामे होत असून, त्यांच्यावर या मोहिमेचा परिणाम झाला आहे. या अनधिकृत बांधकामांची विक्री सामान्यांना झाल्यास त्यांची मोठी फसवणूक होण्याची भीती आहे. त्यांची फसवणूक टाळण्यासाठी याविरोधात कारवाई होत आहे. अनधिकृत बांधकाम थांबवण्याची नोटीस देऊनही काहींची बांधकामे सुरूच असल्याचे आढळले आहे.
भोगवटा प्रमाणपत्र घ्या अन्यथा, दुप्पट कर भरा :
महापालिकेच्या हद्दीत बांधकाम परवानगी घ्यावी लागते. ते झाल्यावर संबंधितांचा अभियंता पूर्णत्वाचा दाखला मनपाला देतो. या दाखल्यानंतर मनपा अभियंता बांधकामाची पाहणी करतात. त्रुटी नसल्यास इमारत वापर परवाना (भोगवटा) देतात. हा परवाना नसल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियम 264(अ) नुसार मालमत्ता कराच्या दुप्पट रक्कम बांधकाम अस्तित्वात वसूल करण्याची कारवाई महापालिका करू शकते.
आमदारांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन : दरम्यान, याविषयीचे वृत्त ‘दिव्य मराठी’त प्रकाशित होत असल्याची कुणकुण लागल्यानंतर येथील एका आमदाराच्या स्वीय साहाय्यकाने बातमी प्रकाशित होऊ नये यासाठी प्रयत्न केले. पण, यात सामान्य व्यक्तीची फसवणूक होत असल्याचे त्यांना सांगितल्यावर त्यांनी चुप्पी साधली. संबंधित बिल्डर सेठचे मित्र आहेत, असे म्हणत दबाव आणण्याचा त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला. दरम्यान, या सर्व घडामोडीत बांधकाम व्यावसायिकांकडून वसुली करणारे काही नगरसेवक अडचणीत आले आहेत.
38 बांधकामे अनधिकृत
महापालिकेच्या पाहणीत 38 बांधकामांमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे. या सर्व बांधकामांमध्ये सुमारे 11 हजार 786 स्वेअर मीटर बांधकाम अनधिकृत झाल्याचे उघड झाले आहे. काहींना नोटीस देण्यात आली आहे. त्यांचा खुलासा योग्य नसल्यास त्यांचे बांधकाम पाडू. महेंद्र कल्याणकर, आयुक्त, महापालिका,अकोला.