आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Weapons Issue At Akola, Divya Marathi

परवानाधारकांचे शस्त्र लॉकअपमध्ये, अनधिकृत शस्त्र बाळगणार्‍यांकडे मात्र दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील परवानाधारक नागरिकांचे पोलिसांनी जमा केलेली शस्त्रे अद्यापही परत करण्यात आलेली नाहीत. शस्त्रे मिळावित म्हणून परवानाधारक पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत असून, पोलिस मात्र जिल्हा प्रशासनाचे आदेश आले नसल्याचे सांगून हातवर करत आहेत. दरम्यान, एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
अनेक गुंड प्रवृतीच्या व्यक्तीकडे अनधिकृत शस्त्रे आहेत. गेल्यावर्षी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून हे सिद्धही झाले आहे. मात्र, या प्रवृत्तीकडे पोलिसांचा कानाडोळा होत आहे. मागील दोन महिन्यांपासून परवानाधारकांची शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. यामुळे परवानाधारकांच्या जीवाला गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून धोका निर्माण झाला आहे. शस्त्रांचा परवाना असणार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील एकाही पोलिस ठाण्याने कोणतीही पावले उचलली नाहीत किंवा त्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नाही.
शस्त्र मिळण्यासाठी अर्ज
काही प्रतिष्ठितांनी तसेच राजकीय पक्षाच्या एका पदाधिकार्‍याने जीविताला धोका असल्याचे कारण देऊन शस्त्रे परत करण्याची विनंती केली. मात्र, त्यांना जिल्हा दंडाधिकार्‍यांचे आदेश आले नाहीत. त्यामुळे शस्त्रे देता येत नाही, असे सांगण्यात आले. पुढील आदेश आल्यावर कळवण्यात येईल, असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली.
शस्त्रधारकांची दिशाभूल
शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता असल्याचे सांगून शस्त्रधारकांची अनेक पोलिस ठाण्यांकडून दिशाभूल केल्या जात आहे. मात्र, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात अधिकृत आदेश नसताना, परवानाधारकांचे शस्त्रे का रोखून ठेवली जात आहे, हा प्रश्नच आहे. दरम्यान, शहरामध्ये अनेक अनधिकृत शस्त्रधारी आहेत. भीतीपोटी त्यांचे नाव कुणी सांगण्यास धजावत नाही. मात्र, पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून संशयितांची झाडाझडती केली नाही. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक मात्र मोकाट आहेत.