आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्डमेड मिथेन युरिया निर्मितीचा राज्यात प्रकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - देशात कोळशापासून युरिया निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार असून विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळपर्यंतच्या पट्ट्यात कोल्डमेड मिथेन या घटकाचे साठे आहेत. या कोल्डमेड मिथेनपासून राज्यात युरिया निर्मितीचा प्रकल्प लवकरच आकारास येणार आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.

चिखली येथे अंबिका अर्बन पतसंस्थेच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार चैनसुख संचेती, आमदार डॉ. संजय कुटे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, राधेश्याम चांडक, विजय कोठारी, हनुमंत भंवर, श्वेेता महाले , खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, देशभरात प्रत्येक भागात केंद्र सरकार चालक परवाना व प्रमाणपत्र केंद्रांची स्थापना करणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून जवळपास ५ लक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. या केंद्रांमुळे गावातील तरुणालाही रोजगाराचा नवीन मार्ग मिळेल. उद्योग निर्मितीचा केंद्रबिंदू देशाचा ग्रामीण भाग राहील. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मितीच्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी गावागावात उद्योग उभारले जातील.

शेतकऱ्यांना उत्पन्न
युरिया निर्मितीमुळे सद्य:स्थितीत असलेल्या युरियाच्या दरांमध्ये कमालीची घट होईल. शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये युरिया मिळेल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला पाणी व २४ तास वीज हवी आहे. हे दिल्यास शेतकरी भरमसाट उत्पन्न घेऊन संपन्न होईल, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला.

बाजारपेठेची मागणी पाहून पेरणी करा, शेतकऱ्यांना आवाहन
महाराष्ट्रातील शेतकरी हा परंपरागत पद्धतीने शेती करत असून काळानुरूप होणारे बदल लक्षात घेऊन व जागतिक बाजारपेठेची मागणी पाहून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पीक पेरणी करावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
गडकरी म्हणाले, देशामध्ये खाद्यतेलाचा प्रचंड प्रमाणात तुटवडा असून विदेशातून तेल आयात करावे लागत आहे. यामध्ये बरेच परकीय चलन खर्च होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेल बियाणे उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा. त्यासाठी सोयाबीन, करडई, तीळ, जवस यासारख्या पिकांची पेरणी करावी. जागतिक बाजारपेठेत कापूस, साखरेचे भाव कोसळलेले आहेत. त्यामुळे कापूस व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तेलबियांसोबतच शेतकऱ्यांनी डाळवर्गीय पीक पेरणीला प्राधान्य द्यावे, जेणेकरून देशाला आर्थिक फायदा होईल आिण तेल व डाळी आयात करण्याची गरज भासणार नाही. बँकेकडून शेतकऱ्यांच्या कर्जवाटपाबाबतीत होत असलेल्या अडवणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नात गडकरी म्हणाले की, सर्व बँकाना पुनर्गठन व कर्जवाटपाचे आदेश दिलेले आहेत. अडवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे कोणीही शेतकऱ्यांची अडवणूक करू नये.

विदर्भातील सर्व खासदार व आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींकडे जाऊन पीक कर्ज देण्याबाबतचे निर्देश देण्यासाठी आम्ही मागणी करू. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जेटली यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी उपस्थित पत्रकारांना सांगितले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली हाेती.