कारंजा - बुधवारीवादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा कारंजा तालुक्यातील म्हसला टाकळी गावांना जोरदार तडाखा बसला. यात म्हसला येथील १० ते १५ घरे क्षतिग्रस्त झाली. त्यामुळे गावकऱ्यांचे दोन लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी वादळी वारा आल्याने म्हसला टाकळी येथील काही घरे, शाळेवरील टिनपत्रे उडालीत. परिणामी, पाडुंरग काळे, रमेश काळे, अरविंद काळे, सय्यद सत्तार, दत्ता घोडसाळ, बाळू काळे, ज्ञानेश्वर काळे यांच्यासह अनेकांचे संसार उघड्यावर आले. अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घराच्या भिंती कोसळल्या. तसेच जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, तहसिलदार चेतन गिरासे नायब तहसिलदार यांनी गुरुवारी गावातील नुकसानाची पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत करून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती तहसिलदारांनी दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर उपस्थित होेते.
वादळी वाऱ्यामुळे शेलूबाजारला जुने झाड कोसळले.
कारंजा, शेलूबाजारला वादळी वाऱ्याचा तडाखा
शेलूबाजारयेथे बुधवारी सायंकाळी गारपीट, वादळी वाऱ्यासह खूप नुकसान झाले. या तडाख्यात गाव सापडल्यामुळे जवळपास अर्धा तास व्यवहार ठप्प झाले होते. अचानक आलेल्या नैसर्गिक
आपत्तीमुळे गावकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळामुळे घराची छपरे हवेत उडून गेली. घरे, दुकानात पाणी शिरले. पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीसाठी हे वर्ष आपत्तीचे ठरले आहे. हाती आलेल्या पिकांची नासधूस सुरू आहे. शेतातील पपई, कपासी, आंबे, ऊन्हाळीमूग तसेच इतर पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. नुकसान झाले असले तरी अद्याप त्याची पाहणी करायला कोणीही आले नव्हते. शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.