आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभा निवडणूक: सर्वच पक्ष लागले तयारीला; मतांची बेरीज-वजाबाकी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अकोल्यामध्ये जातीय समीकरणाचे जुनेच चित्र कायम राहण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले असून मतांची बेरीज आणि वजाबाकी सुरू झाली आहे.

या मतदारसंघात भाजप आणि भारिप-बमसंचे प्रभुत्व आहे. या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकीत तिरंगी लढत झाली. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सत्तेत जम बसवणार्‍या भारिपला काँग्रेसशिवाय लोकसभा निवडणुकीत तरणोपाय नाही. गत दोन लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला असता, मतांचे विभाजन झाल्यानेच भाजपाचा उमेदवार निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. भारिप - बमसं किंवा काँंग्रेस दोन्ही पैकी कोणताही पक्ष स्वबळावर अकोला लोकसभा जिंकू शकत नाही.

भारिपची शक्ती दाखवण्यासाठी अँड.आंबेडकरांनी आधी जिल्हा परिषद आणि नंतर महापौरपदाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन 7 नगरसेवकांच्या भरवशावर महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र येथे देखील त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. मागील लोकसभा निवडणुकीत भारिप-बमसंची ताकद बाळापूर आणि मूर्तिजापूरमध्ये दिसली. 2004 व 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंतिम क्षणापयर्ंत काँग्रेसजनांनी केलेल्या मनधरणीला कुठलीही दाद न देता भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. कुणाच्या कुबड्यांची आता गरज नाही, असा अति आत्मविश्वास त्यांच्या अंगलट आला. ज्या काँग्रेसजनांच्या सक्रिय पाठिंब्यावर त्यांनी दोनवेळा लोकसभा गाठली, त्या मित्रांना टाटा करणो त्यांना भोवले. आगामी निवडणूक ते काँगेससोबत लढण्यात उत्सुक आहेत. आता भारिप-बमसंची सत्ता असलेल्या अकोला जि.प. व मनपातील गैरकारभार पाहता जनमत अँड. आंबेडकर यांच्या बाजूने कितपत झुकते यावर प्रश्नचिन्ह आहे. मनपात भारिप-बमसला साथ देऊन काँग्रेसवरच पश्चातापाची पाळी आली. अँड. आंबेडकरांनी स्थानिक स्वराज्य संस्थात भारिप-बमसंचे जाळे विणले. केवळ सत्ता प्राप्तीसाठी त्यांनी काँग्रेसचा वापर केला असा आरोप करून येथील काँग्रेस नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी ‘एकला चलो रे’ ची विनंती हायकंमाडकडे केल्याची माहिती आहे.

1985 मध्ये काँग्रेसचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात आता काँग्रेसची वाताहत झाली. सध्या या जिल्ह्यात कॉंग्रेसचा निवडून आलेला एकही आमदार नाही. काँग्रेसपुढे जिल्ह्यात शुन्यातून विश्व निर्माण करण्याचे आव्हान आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव तायडे व रिसोडचे अनंतराव देशमुख यांची नाव चर्चेत आहे. लक्ष्मणराव तायडे 18 वर्षे काँगेसचे जिल्हाध्यक्ष राहिले असून, बाळापूर विधानसभेचेही प्रतिनिधित्व केले आहे. अँड.आंबेडकरांनी पाठ दाखवल्यावर 2004 मध्ये पक्षाची इभ्रत राखण्यासाठी आयत्यावेळी लक्ष्मणराव तायडे यांना काँग्रेसने मैदानात उतरवले होते. रिसोडचे अनंतराव देशमुख यांनी 2009 मध्ये काँग्रेसचे आ.सुभाष झनक यांच्या विरोधात बंडखोरी करुन विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्यांनी आता अकोला लोकसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे. पण अकोला जिल्ह्यातील जनसंपर्काचा अभाव व रिसोड तालुक्यातून आ.सुभाष झनक यांच्या रुपाने विरोध यामुळे अनंतराव देशमुख यांच्यासाठी ही वाट खडतर दिसत आहे.

भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी हॅट्ट्रिक साधण्याच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. पाटील समाजाचे मतदार कायम ठेवून इतर समाजाचे मते आपल्याकडे वळवण्याची कसरत खा.संजय धोत्रेंना करावी लागेल. अकोला लोकसभा निवडणुकीत भाजपाची वोटबँक फोडणारी कुणबी समाजासारखी एखादी फळी निर्माण झाली तर येथील राजकीय समीकरण बदलू शकते व हा बदल धोत्रेंसाठी डोकेदुखी ठरू शकतो.