आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुरंगी थापट्या बदकांची संख्या रोडावतेय, रंगीत पंख मांसासाठी होणा-या शिकारीचा परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातील तलावावर आढळणा-या अनेकविध बँकांपैकी देखणा बहुरंगी शॉवर ज्याला मराठीत थापट्या म्हणतात. आपल्या दोन्ही पंखांनी थापट्या मारल्याप्रमाणे फडफडताना जिल्ह्यातील तलावावर त्याचे हिवाळ्यात दर्शन घडते. त्याला थापट्या म्हणून ओळखण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याची चोच लांब पुढे फावड्याप्रमाणे चापट असते.
अकोला जिल्ह्यातील दगडपारवा, कापशी, कुंभारी, शिसामासा तलावावर दरवर्षी हिवाळ्यात येणाऱ्या पाहुण्यांमध्ये थापट्या हा लक्षवेधी पाहुणा ठरतो. अलीकडे त्याची संख्या बोटांवर मोजण्याइतकी असते. पूर्वी मोठ्या संख्येने शॉव्हलरचे आपल्याकडे आगमन होत होते. शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील तलावांवरही तो हजेरी लावतो. थापट्याची चोच अडीच इंच लांब असते पुढे फावड्यासारखी चपट असते. चोचीवर 100 वर अति बारीक छिद्रे असतात. याच छिद्रांमधून त्याचे अन्न तो पाण्यातून गाळून घेतो. थापट्यांच्या नराचे डोके चमकदार, झळाळणारे, हिरवे असते. छाती पांढरीशुभ्र असते, तर पोट आणि पंख चमकदार पिवळे, तपकिरी असतात. त्याने पंख उघडले, तर त्यावर चमकणारा, झळाळणारा हिरव्या रंगाचा पट्टा ठळकपणे दिसून येतो. चोच काळी असून, पाय उठावदार भगव्या रंगाचे असतात जे पाण्यात पोहतानाही नजरेस पडतात. थापट्याची मादी मात्र साध्या रंगाची असते. उडताना तिच्या पिसांचे टोक राखाडी निळसर रंगाचे दिसते, तर खालची पिसे गडद हिरव्या रंगाची दिसतात. थापट्याची मादी मलार्ड, गढवाल बदकांच्या मादीसारखी असते. नर-मादी दर हंगामात बदलत नाहीत. नर मादीला आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या करतो. मीलनानंतर जलाशयाजवळच्या गवताळ प्रदेशात किंवा खुरट्या झुडपांमध्ये मादी अंडी घालते. पाण्याजवळील काड्यांच्या आधाराने ही बदके आपले घरटे बांधतात. मादी ते अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले बरेच दिवस झुडपांमध्ये लपून असतात. मात्र, चांगली वाढ झाल्यानंतर पाण्यात फिरतात. हे बदक स्थलांतरित अाहे. आज त्यांचे दर्शन घडत असले, तरी त्यांच्या रंगीत पंख मांसासाठी होणाऱ्या शिकारीमुळे संख्या रोडावत आहे.