आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत देसाई क्रीडांगणावर खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कुठे राजामाता जिजाऊ तर कुठे झाशीची राणी, महिला पोलिस अधिकारी अन् डॉक्टरही तर कुठे टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या पालखीत लक्ष वेधणारी चिमुकली, अशा पथसंचलनातून शुक्रवार, १६ जानेवारीला वसंत देसाई क्रीडांगणावर स्त्री शक्तीचा जागर दिसून आला. जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा यानिमित्ताने लक्षवेधी ठरला.
वसंत देसाई क्रीडांगणावर खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद््घाटन झाले, तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई होते. व्यासपीठावर आमदार बळीराम सिरस्कार, रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अलकाताई खंडारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदासजी पालवे, पांडुरंग पाटील खेंडकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी, ज्योत्स्ना चोरे, शोभाताई शेळके, जावेद ईनामदार, अक्षय लहाने, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, सविता वाघमारे, गोपाल कोल्हे, रवींद्र गोपकर, जमीर उल्लाखान आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद््घाटनीय भाषणात खासदार संजय धोत्रे यांनी पाचही जिल्ह्यांतून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.

त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘बेटी बचाओ’, स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. अकोटच्या क्रिएटिव्ह ग्रुपने भारत दर्शन या नृत्य सादरीकरणातून देशातील वैविध्यातील एकतेचे प्रदर्शन केले, तर अकोला जिल्हा परिषदेच्या फिनिक्स ग्रुपने ‘पिंगा गं बाई पिंगा’ या पथनाट्यातून स्त्री समस्या, हुंड्याचा समाजावरील पगडा यावर प्रकाश टाकला. त्यानंतर पाचही जिल्ह्यांच्या खेळाडूंनी पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. यामध्ये सर्वप्रथम मागील वर्षीचे विजेते यवतमाळचे खेळाडू होते. त्यामागोमाग असलेल्या अमरावतीच्या संघाने लेजीम पथकाच्या माध्यमातून लक्ष वेधले, तर बुलडाणाच्या संघाने संत गजानन महाराजांची पालखी, वारी, नारीशक्ती पायी दिंडी सोहळ्यातून डोळ्यांची पारणे फेडली. चिखलीच्या सभापती सविता वाघमारे स्वत: जिजाऊच्या वेशभूषेत संचलनात सहभागी झाल्या. पालखीत दत्तक घेतलेली चिमुकली होती, तर समोर रांगेत झाशीची राणी, महिला डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शेतकरी महिला दाखवण्यात आली. त्यासोबतच खेळाडूंनी भारुड, पावली खेळून विठ्ठलाचा गजर केला. त्यानंतर वाशीम अकोलाच्या खेळाडूंनी मानवंदना दिली. गजानन डोईफोडे यांनी खेळाडूंना शपथ दिली. त्यानंतर झालेल्या अध्यक्षीय भाषणातून जि. प. अध्यक्ष शरद गवई यांनी क्रीडा सांस्कृतिक महोत्सवातून पाचही जिल्ह्यांतील खेळाडूंनी खिलाडूवृत्ती, एकोपा, सामंजस्य जोपासण्यावर भर दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण उन्हाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश अंधारे, माॅन्टीसिंग यांनी केले. डॉ. सुभाष पवार यांनी आभार मानले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी : सायंकाळीनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सांस्कृतिक गटात गायन, नृत्य, अभिनय आदी विविध प्रकारात पाचही जिल्ह्यांतील महिला, पुरुषांनी आपले सादरीकरण करून रंगत आणली.