आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Soon Political Changes Will Be Happen In Akola

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात होणार राजकीय उलथापालथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- हैदराबाद येथील मज्जलिस ए इत्तेहादूल अल मुसलमिन अर्थात एमआयएम या राजकीय पक्षाची उभारणी अकोल्यात करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. एमआयएमचे आमदार अकरोबुद्दिन ओवेसी यांचे अकोल्यात ईदची शुभेच्छा देणारे फ्लेक्स झळकल्याने पक्ष बांधणीचे संकेत प्राप्त झाले. एमआयएमची कार्यप्रणाली लक्षात घेता अल्पसंख्यांकांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करणार्‍या अनेक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एमआयएमची धडक ही काही पक्षाच्या मुळावर तर काहींच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे. अल्पसंख्यांकासाठी आक्रमकपणे आणि आड पडदा न ठेवता पुढाकार घेणारा, अशी एमआयएमची ओळख आहे.

त्यामुळे एमआयएमने पक्ष बांधणी केल्यास अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. या विभाजनाचा फटका कॉँग्रेस, राष्ट्रवादी, युडीएफला बसेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. हे विभाजन भाजप-शिवसेनाच्या पथ्थ्यावर पडेल. एमआयएमचा विस्तार : हैदराबाद महापालिकेत 150 पैकी 43 नगरसेवक आहेत. एमआयएमने महाराष्ट्रात प्रथम नांदेड येथे धडक दिली. नांदेड मनपा निवडणुकीत एमआयएमचे 11 नगरसेवक निवडून आले. दरम्यान जयहिंद चौकात प्रसिद्ध झालेल्या फ्लेक्सवरील छायाचित्र व एमआयएमशी आपला संबध नसल्याचे साजीद खान यांनी स्पष्ट केले आहे.


सर्वच राजकीय पक्षांची संमिश्र प्रतिक्रिया

तोटा नाही
पक्षाला तोटा होणार नाही. मतदार हे उदारमतवादी, सुशिक्षित आहेत. या पक्षात कट्टरवादाला स्थान नाही. अजय तापडीया, राष्ट्रवादी कॉंग्रेस

मतदार समजदार
कॉँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कॉँग्रेस सर्वच समाजघटकांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतो. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याचा प्रश्‍न नाही. मदन भरगड, महानगराध्यक्ष, कॉँग्रेस

नांदेडची पुनरावृत्ती
कॉँग्रसने सर्व समाज घटकांचा भ्रमनिरास केला आहे. याचा फटका त्यांना बसेल. येथे नांदेडची पुनरावृत्ती होईल. डॉ. अशोक ओळंबे, भाजप

युडीएफ सर्वांचे
युडीएफ हा केवळ मुस्लिमांसाठी नाही तर सर्वच समाजघटकांसाठी लढणारा पक्ष आहे. त्यामुळे युडीएफला नुकसान होणार नाही. अँड. परवेझ डोकाडिया, महानगराध्यक्ष, युडीएफ.

शिवसेनेला फायदा
एमआयएम येथे आल्यास शिवसेनेला फायदा होईल. अल्पसंख्यांक समाज शिवसेनेकडेही वळत आहे. राजेश मिश्रा, शिवसेना

अकोला लक्ष्य का ?
अकोला पश्चिममध्ये दोन लाख 58 हजार मतदार असून, अल्पसंख्यांक मतदारांची संख्या एक लाख एक हजार 900 आहे. त्यामुळे या मतांवरच विजय अवलंबून आहे. परिणामी एमआयएम येथे आकृष्ट झाला आहे. मनपात 19 नगरसेवक मुस्लिम आहेत. यांची मोट बांधण्यास एमआयएमला यश आल्यास राजकीय चित्रच बदलेल.