अकोला - एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे महामंडळाच्या तोट्यामध्ये दरवर्षी वाढ होते. आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये वायफाय सुविधा मोफत पुरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सुखरूप व सुरक्षित प्रवास, गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी हे महामंडळाचे ब्रीद आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांसह ग्रामीण भागाला एसटी बसने जोडलेले आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला दळणवळणाचे मोठे साधन उपलब्ध झालेले आहे. मात्र, एसटीची अवस्था पाहता प्रवासी खासगी वाहनांकडे वळलेले दिसत आहेत. महामंडळाने प्रवाशांकरिता अनेक सोयी-सवलती सुरू केलेल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेणारे प्रवासीच एसटीमध्ये बहुसंख्येने दिसून येतात. त्यामुळे तोट्यात आणखीच भर पडत चालली आहे. एसटीच्या लाल डब्यांतील प्रवाशांना वायफाय सुविधा मोफत पुरवण्याच्या निर्णयामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्यातील १७ हजार बसेसमध्ये लवकरच मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रवासीवर्गाला आकर्षित करण्याच्या हेतूने ही वायफाय सेवा सुरू करण्यात येणार आहे. गावागावांत पोहोचलेल्या एसटीमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यात वायफाय पोहोचणार आहे. एसटीच्या १७ हजार साध्या, निमआरामव शिवनेरी बसगाड्यांमध्ये वायफाय मोडेम बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोबाइल, लॅपटॉपवर वायफायची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बसमध्ये वायफाय
१७ हजार बसेसमध्ये लवकरच वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अशी मिळणार सुविधा
प्रवाशांना मोबाइल, लॅपटॉपवर काही करमणुकीचे कार्यक्रम उपलब्ध करून दिले जाणार असून, आगामी सहा महिन्यांत ही सेवा सर्व एसटी गाड्यांमध्ये सुरू होईल. ही सेवा तीन टप्प्यांत सुरू करण्यात येणार अाहे. पहिल्या टप्प्यात ५० एसटी बसमध्ये ही सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य बसगाड्यांमध्येसुद्धा वायफाय सुविधा सुरू होणार आहे.
अद्याप सूचना नाही
^एसटीमध्ये वायफाय सुविधा पुरवण्यासंदर्भात अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. महामंडळाच्या विचाराधीन ही बाब असून, मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू होणार अाहे. सूचना प्राप्त होताच तत्काळ सेवा पुरवण्यात येईल. मात्र, या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.''
ए. एम. सोले, विभाग नियंत्रक अकोला