आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तालुकाध्यक्षाच्या नियुक्तीवरून जिल्हाध्यक्षांचा ‘ना’राजीनामा; विजय मालोकार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोट तालुकाध्यक्ष नियुक्तीच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय मालोकार यांच्यासह अनेकांनी रविवार, 22 जून रोजी राजीनामा दिला आहे. मालोकार आता कुठल्या पक्षात जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.
मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट तालुकाध्यक्ष मुकेश निचळ यांची नियुक्ती रद्द करून श्रीकांत गावंडे यांची नियुक्ती केली, तर अकोट शहर अध्यक्ष नीलेश बरेठिया यांची नियुक्ती रद्द करून कैलास धुळे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीचा वाद राज्य पातळीवर गेला. मुकेश निचळ यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला. त्यामुळे त्यांची नियुक्ती कायम ठेवण्याचा संपर्कप्रमुख प्रा. सुधाकर तांबोळी यांनी लेखी आदेश दिला. या लेखी आदेशाची कॉपी मिळताच जिल्हाध्यक्ष विजय मालोकार यांनी तत्काळ राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष यांच्या राजीनाम्यानंतर इतरही काही पदाधिकार्‍यांनी मनसेच्या मुख्यालयी राजीनामे पाठवले आहे.
शिवसेनेला आनंद, भारिपला अडचण
मनसे जिल्हाध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोला (पूर्व) ची दावेदारी केल्यास मतविभाजनाचा फटका हा शिवसेना उमेदवारांना बसतो. त्यामुळे या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना मोठा आनंद झाल्याची बातमी आहे, तर या राजीनाम्यामुळे
भारिप-बमसंची मोठी अडचण होणार असल्याचे राजकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

गाडीच्या खरेदीचा मुद्दा : या सर्व घडामोडीत एका गाडीच्या खरेदीचा मुद्दा कळीचा ठरल्याची माहिती आहे. या गाडीच्या खरेदीवरून हे सर्व घडल्याची माहिती समोर आली. पण, असा कुठलाही वाद नसल्याचे तालुका अध्यक्ष मुकेश निचळ यांनी स्पष्ट केले.
राजीनामा पाठवला
मनसेच्या उभारणीत अकोल्यात मोठी मेहनत घेतली. तालुका अध्यक्ष मुकेश निचळ यांनी राजीनामा देण्याचे सर्वत्र सांगितले. सहा ते सात महिने त्यांनी कामच केले नाही. निचळ यांनी या पदामुळे लग्न होत नसल्याचे सांगितल्यानंतर पक्षविस्तारासाठी अकोट येथे इतर उच्चशिक्षितांची नियुक्ती केली. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाल्याने राजीनामा राजगड मुख्यालयी पाठवला आहे.’’
विजय मालोकार, जिल्हाध्यक्ष, मनसे.
अनधिकृत नियुक्तींचा मुद्दा
पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती व बदल होतात. असे जिल्हाध्यक्षांनी बदल करणे अपेक्षित नाही. मालोकारांनी राजीनामा दिला की नाही, याची कल्पना नाही.’’
- प्रा. सुधाकर तांबोळी, संपर्क अध्यक्ष, मनसे.
पक्ष जे सांगेल ते करेल
पक्षाने नियुक्तीचे पत्र दिल्याने पक्षविस्ताराचे काम करत आहे. मालोकार यांच्या राजीनाम्याबद्दल मला काही माहीत नाही. मालोकारांचे आरोप निराधार आहेत. पक्षाने नियुक्तीचे पत्र दिल्याने काम करत आहे.’’
- मुकेश निचळ, अकोट तालुका अध्यक्ष, मनसे.