आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawade News In Marathi, BJP, Lok Sabha Election, Legislataure Council

अकोल्यातील निवडणुकीमध्ये अंतिम क्षणापर्यंत चुरस - विनोद तावडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘लोकसभा निवडणुकीत काही जागांवर लढत सुरुवातीला सोपी वाटली. पण, अकोल्यातील लढत ही सोपी राहिली नाही ती तिरंगी झाली. त्यामुळे सुरुवातीला केवळ भाजपची थेट लढत राहील, असे चित्र आता बदलले आहे. त्यामुळे अंतिम क्षणी चुरस राहील,’ असे मत भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत भाजप उमेदवार संजय धोत्रे व आमदार डॉ. रणजित पाटील यांची उपस्थिती होती.


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या मातोर्शी यांनी गांधी परिवाराचे व्यक्तिस्तोम माजवले, तर चालते. तेव्हा काँग्रेसचा प्रचार होत होता. आम्ही नरेंद्र मोदींचे नाव पुढे केले, तर म्हणे भाजपचा कुठे आहे. पृथ्वीराज चव्हाणांना ही भूमिका शोभत नाही, अशी टीका विनोद तावडे यांनी केली. शरद पवार यांनी अकोल्यातील सभेत नरेंद्र मोदींना हुकूमशाह म्हटले. त्यांचे हे वक्तव्य चुकीचे असून, त्यांना गेली 15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदीचे सरकार ज्ञात नाही का, असा प्रश्न तावडे यांनी विचारला. प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार येथे सुरू आहे. पण, त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेली सत्ता आणि त्याचा जनतेला होत असलेला त्रास पाहता त्यांच्या फसव्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही, असे मत तावडे यांनी व्यक्त केले.या पत्रकार परिषदेला रामदास आंबटकर, डॉ. जगन्नाथ ढोणे, तेजराव थोरात, रणधीर सावरकर, प्रतुल हातवळणे, गिरीश गोखले, गिरीश जोशी, विजय अग्रवाल यांची उपस्थिती होती.


अंडरकरंटची भीती : अकोल्याची निवडणूक सोपी राहिली नाही, याचे कारण पुढे करताना विनोद तावडे यांनी या निवडणुकीत विशिष्ट समाजात दिल्या जाणार्‍या संदेशाचा उल्लेख केला. तसेच ग्रामीण भागातदेखील असे विशिष्ट संदेशामुळे अडचण झाल्याचे ते म्हणाले. मतदानाच्या दिवसापर्यंत शेवटच्या क्षणी नेमके कोणते अंडरकरंट काम करतात, याकडे राजकीय पक्षाचे लक्ष आहे.


आमचा आश्वासक, राष्ट्रवादीचा गुपचूप : आमचे सरकार येणार आहे. आम्ही दिलेली वचने पाळावी लागणार आहेत. त्यामुळे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास थोडा उशीर झाला तो वास्तववादी आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने इंटरनेटवर गुपचुप जाहीरनामा टाकला. निवडणुकीत पराभव होणार असल्याने त्यांनी ही कृती केल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला. महायुतीत एकोपा आहे, अधिक प्रचारसभा घेण्यासाठी स्वतंत्र दौरे काढले, असा दावा त्यांनी केला. महायुती विधानसभा निवडणुकीतदेखील कायम राहील. नवीन कोणी महायुतीत येणार नसल्याचे ते म्हणाले.


केंद्रीय निवडणूक आयोगाने 24 तासांत मदत द्या, अशी भूमिका गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बाबतीत घेतली होती. पण, अद्याप शेतकर्‍यांना पैसा देण्याची सोय राज्य सरकारने केली नाही. राज्याची तिजोरी खाली असल्याने केंद्राच्या निधीची राज्य सरकार वाट पाहत आहे. गारपीटग्रस्तांना मदतीचे आश्वासन देणार्‍या काँग्रेस सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या सरकारला शेतकर्‍यांनी धडा शिकवावा, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.