आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawade News In Marathi, BJP, Sanjay Dhotre, Akola Lok Sabha Constituncy

आघाडी सरकारचा भ्रष्टाचार सर्वव्यापी,विनोद तावडे यांचा घणाघाती हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘आघाडी सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार वाढला. त्याची झळ महागाईच्या रूपात सर्वसामान्य माणसांना सहन करावी लागत आहे. या सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनी हवा, जमीन आणि पाताळ या नैसर्गिक बाबीसुद्धा भ्रष्टाचाराने बाटवल्या’, असा आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला. भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ येथील मोठी उमरी येथे सोमवारी रात्री 9 वाजता पार पडलेल्या प्रचार सभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब कपले होते. या वेळी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, डॉ. रणजित पाटील, प्रकाश शेंडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख र्शीकांत पिंजरकर, रिपाइं (आठवले) जिल्हाध्यक्ष डी. गोपनारायण, गिरीश गोखले, माधुरी कपले, मंदाकिनी फुंडकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. तावडे पुढे म्हणाले, ‘‘आघाडी सरकारने टू-जी घोटाळा करून हवेत भ्रष्टाचार केला. कोळसा घोटाळ्याने पाताळ बाटवले आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत भ्रष्टाचार करून जमीनही सोडली नाही. त्यामुळेच देशाची प्रगती खुंटली आहे. पाकिस्तानचे दहशतवादी आपल्या सीमेत घुसखोरी करून आपल्या वीर जवानांचे शिर धडावेगळे करतात, दिल्लीत बलात्कार होतात, चीन देशासमोर समस्या निर्माण करतोय तरीही आपले पंतप्रधान पुतळ्यासाखरे सर्व काही पाहत आहेत. हे चित्र बदलवण्यासाठी मोदींना पंतप्रधान म्हणून निवडून द्या’’, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. शिवाय मोदी यांनी गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली तसेच भाजप सत्तेत आल्यास कशा पद्धतीने विकास करेल, हे सांगितले. प्रास्ताविक भाऊसाहेब कपले यांनी केले. किशोर मुळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
‘घड्याळा’वर टीका आणि ‘काट्या’वर लक्ष
रात्री 9.37 वाजता तावडे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. पण, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी ही सभा 10 वाजता संपायला हवी, यासाठी सातत्याने त्यांचे लक्ष घड्याळाकडे होते. 9.52 मिनिटांनी त्यांनी भाषण थांबवले.