आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यात व्हीआयपी नंबरची ‘क्रेझ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महागड्या गाड्या खरेदी करण्याएवढे पैसे खिशात बाळगणार्‍यांची खास क्रमांकासाठी आणखी काही लाख रुपये मोजण्याची तयारी सहज असते. अशा ग्राहकांचे व्हीआयपी क्रमांकांचे वेड ओळखून खास क्रमांक विकण्याची योजना परिवहन खात्याने आधीच सुरू केली होती़ वाहनधारकांमध्ये आता व्हीआयपी क्रमांकाची ‘क्रेझ’ आहे. यावर्षी 257 वाहनांसाठी व्हीआयपी क्रमांकांची विक्री झाली आहे.

काही वर्षांपासून महागड्या गाड्या खरेदी करण्याकडे वाहनधारकांचा कल आहे. मात्र, महागड्या गाड्या खरेदीची आवड एवढय़ावरच र्मयादित नाही. आपल्या गाडीला नेहमीच्या क्रमांकांपेक्षा वेगळा, खास क्रमांक असावा यासाठीही त्यांचा अट्टाहास असतो. जास्तीचे पैसे मोजल्यावर जशी महागडी गाडी घेता येते, त्याच धर्तीवर हे क्रमांकही विकत घेण्याची सुविधा असल्याने हौशी ग्राहकांचा फायदा झाला आहे. या व्हीआयपी क्रमांकामुळे परिवहन विभागाला मोठा महसूल मिळत आहे. अकोला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून यावर्षी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी अशा 257 क्रमांकांची विक्री झाली आहे. या विक्रीतून या कार्यालयाला 16 लाख 56 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

या कार्यालयातून वाहनांच्या व्हीआयपी क्रमांकाची विक्री सुरू झाल्यामुळे महसूल प्राप्तीचे नवीन साधन प्राप्त झाले आहे. आता अतिमहत्त्वाच्या क्रमांकांची अधिकृतरीत्या विक्री सुरू झाली़ त्यानुसार व्हीआयपी क्रमांकांचे दर निश्चित करण्यात आले. साधारणत: तीन हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत हे दर आहेत़ परिवहन विभागाने नोटीफाइड क्रमांकांची यादी केली आहे. दुचाकी आणि चारचाकीसाठी परिवहन विभागात क्रमांक राखीव आहेत. दुचाकीचा क्रमांक चारचाकीसाठी वापरायचा असल्यास त्याला ‘नंबर जंपिंग’ म्हणतात. या नंबर जंपिंगसाठी वाहनधारकांना तीनपट पैसे भरावे लागणार आहेत.

व्हीआयपी क्रमांकाला मागणी
व्हीआयपी क्रमांकाला चांगली मागणी आहे. अशा क्रमांकाच्या विक्रीसाठी शासनाचे नियम आहेत. त्यानुसार वाहनधारकांना क्रमांक दिले जातात. त्या माध्यमातून चांगल्या प्रमाणात महसूल मिळत आहे. विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला

007 जेम्स बाँड
सिक्रेट एजंट जेम्स बाँडचा 007 हा कोड जागतिक कीर्तीवर पोहोचला आह़े या क्रमांकाला प्रचंड मागणी आहे. वाहनाला 7 क्रमांक मिळाल्यावर त्यापुढे दोन शून्य लावून या क्रमांकाची वाहने फिरवली जातात़

दादा, काका, राजची करामत
मोटारींसाठी विशिष्ट क्रमांक मिळाल्यावर नंबरप्लेटवर नावाची करामत केली जात़े हा क्रमांक विशिष्ट पद्घतीने लिहिल्यास दादा, काका, राज आदी अक्षरे दिसतात. त्यामुळे अशा क्रमांकाला विशेष मागणी असते. मात्र, यातील काही क्रमांक हे व्हीआयपी क्रमांकात येत नाहीत. काही वाहनधारक ‘जंपिंग नंबर’ सुविधेचा वापर करून असे क्रमांक प्राप्त करतात.

राजकारण्यांनाही आकर्षण
व्हीव्हीआयपी क्रमांकाच्या नंबरप्लेटचे राजकारण्यांना प्रचंड आकर्षण आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या गाडीचे व्हीआयपी क्रमांक आहेत. विशिष्ट क्रमांकासाठी नेत्यांचा आग्रह असतो. लकी क्रमांक व त्यावर गाडीची ओळख म्हणून विशिष्ट क्रमांकाची मागणी केली जाते.

‘लकी’ नंबरसाठी धडपड
नियमाप्रमाणे मिळणार्‍या नंबरप्लेटमध्येही विशिष्ट क्रमांक असावेत, विशिष्ट क्रमांक असू नयेत, त्यांची बेरीज अमुक यावी अशा इच्छा गाडी विकत घेणार्‍या बहुतेकांची असते. त्यामुळे पैसे मोजून विशिष्ट क्रमांक मिळवण्याचा खटाटोप करणारे अशा आकड्यांबाबत अधिकच र्शद्घाळू असतात.