आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलदर्शन एक्स्प्रेसची पहिली फेरी पंढरीकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - न्यू अमरावती- पंढरपूर विठ्ठलदर्शन एक्स्प्रेसची पहिली फेरी 3 जुलैला वारक-यांसह अकोला रेल्वेस्थानकावरून दुपारी 4 वाजता रवाना झाली. या गाडीच्या इंजिनचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून चालकासह वारक-यांचा सत्कार करून ‘जय हरी विठ्ठल’च्या गजरात वारक-यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

विदर्भ वारकरी संतभूमी संरक्षण सेवा समितीचे मार्गदर्शक बालमुकुंद भिरड यांच्या हस्ते गाडीची पूजा करण्यात आली. संत नामदेव, ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकाराम, एकनाथ महाराजांची परंपरा शेकडो वर्षांपासून वारकरी कायम ठेवून आहेत. सनातन धर्माची पताका घेऊन ईश्वरभक्तीसह विश्वकल्याणाची संकल्पना असणारा वारकरी संप्रदाय असून, त्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन बालमुकुंद भिरड यांनी केले. संतभूमी संरक्षण समितीचे ज्येष्ठ सदस्य श्रीराम मोरवाल यांनी गाडीचे चालक ए. एम. श्रीवास्तव, अतुल लोनसाने यांचा दुपट्टा, नारळ देऊन सत्कार केला, तर मधुकर रुदानकर यांनी अकोला रेल्वेस्थानकाचे प्रबंधक बी. पी. गुजर यांचा सत्कार केला. या वेळी गाडीच्या इंजिनचे रीतसर पूजन करून श्रीफळ फोडून वारक-यांना निरोप देण्यात आला, तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. श्रीराम मोरवाल यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखवून वारक-यांना लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले.
पंढरपूरला जाणा-या वारक-यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काहीशी रोडावलेली दिसली, तरी वारक-यांचा उत्साह दांडगा होता. गाडीत बसलेले वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत होते, तर एका डब्यात बसलेल्या महिला वारक-यांचे भजन सुरू होते. या वेळी वासुदेव बेंडे, सचिन पाटील, रवींद्र दुतोंडे, प्रल्हाद ढोरे, अशोक रुदानकर, बळीराम क्षीरसागर, गणेश चिंतामणे, सतीश वानखडे, वसंता अलोणे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील 11 वर्षापासून विदर्भातील विठ्ठल भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र गाडी सुरू करुन सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा फायदा भाविक हे घेत आहेत.

रेल्वे सोडणार चार फे-या
पंढरपूरला जाणा-या वारक-यांसाठी न्यू अमरावती- पंढरपूर एक्स्प्रेस ही विशेष गाडी सुरू केली आहे. ही गाडी पंढरपूरला 3, 4, 6 व 7 जुलैला जाणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी 5, 6, 11 व 12 जुलैला पंढरपूर येथून निघेल. अमरावती येथून निघणाºया या गाडीला आठ कोच असून, अकोल्यातून दोन जनरल डबे खास राहतील. तसेच खामगाव येथून सहा डबे जुळतील. असे एकूण 16 डबे गाडीला असून, त्यामध्ये 11 जनरल, 1 एसी, 1 जनरल स्लीपर तर 1 स्लीपर कोच अशी व्यवस्था आहे, अशी माहिती स्टेशन प्रबंधक बी. पी. गुजर यांनी दिली.