आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vivek Velankar Guide To Student Issue At Akola, Divya Marathi

‘निकालापूर्वीच ठरवा क्षेत्र’ विवेक वेलणकर यांनी केले मार्गदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दहावी, बारावीनंतर काय करणार आहे, असा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याला विचारला, तर बघू निकाल लागल्यानंतर, असे उत्तर सर्रास दिले जाते. पण, आपल्याला कशात करिअर करायचे आहे, याचा निर्णय आधी घेतल्यास भविष्यात त्याचा फायदा होतो. त्यामुळे परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच निर्णय घेऊन क्षेत्र निश्चित करावे, असा सल्ला पुण्याचे करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी दिला. दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअरमध्ये शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मार्गदर्शन केले.
करिअरची निवड करताना नेहमीच्या क्षेत्रांव्यतिरिक्त अजूनही बरेच क्षेत्र आहेत. बर्‍याच वेळा पालक आणि शिक्षकांनाही माहीत नसणारी माहिती मुलांकडे असते. आपल्याकडे असलेले कौशल्य, आवड याचा विचार करून करिअरची निवड करावी. आपण शिकत असलेल्या विषयांचे तीन भाग करावे. आवडणारे, कमी आवडणारे आणि जे अजिबात आवडत नाही असे, यावरून आपण कशात करिअर करावे, याचा विचार करायला सोपे जाते. त्यानंतर नेहमीच्या क्षेत्रांपेक्षा अन्य कोणते क्षेत्र आहे याचा विचार करावा. दहावीनंतर अकरावी, बारावी न करता डिप्लोमासुद्धा करता येतो. एमसीव्हीसी, फाइन आर्ट, कृषी, अभियांत्रिकी डिप्लोमा करता येतो.
बारावीनंतर आर्ट्स, कॉर्मस आणि सायन्स या क्षेत्रांव्यतिरिक्त लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, फाईन आर्ट, डिझाइनिंग, बीबीए, बीसीए असे अनेक क्षेत्र आहेत, ज्यांचा आपण कधी विचारच करत नाही. मेडिकल, इंजिनिअरिंग करतानादेखील त्यात सुरू असलेल्या विविध विभागांची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात उपविभाग आहेत. आपल्याकडे त्याची किमान माहिती असावी. याशिवाय पुण्या-मुंबईला अँडमिशन घेण्याकडे आपला अधिक कल असतो. पण, फक्त तेथेच चांगले कॉलेज आहेत, असे नाही. भुसावळ, नागपूर, अहमदाबाद, अशा अनेक शहरांमध्ये उत्कृष्ट कॉलेज आहेत. त्यामुळे शहर ठरवून कॉलेजची किंवा विषयाची निवड करू नये, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना दिला.